पाऊण वर्षाच्या दुराव्यानंतर पंकजा मुंडे जिल्ह्यात,`महाराष्ट्राची वाघीण`आली म्हणत स्वागत..

यापूर्वी २१ जानेवारी महिन्यात पंकजा मुंडे जिल्ह्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन व संसर्गाच्या भितीमुळे त्यांना जिल्ह्यात येता आले नाही.
Pankaja munde enter beed after nine month news
Pankaja munde enter beed after nine month news

बीड : विधानसभा निवडणुकीतील पराभव, पक्षाकडून डावलण्याचे प्रकार यामुळे अस्वस्थता, त्यातच पुन्हा लॉकडाऊन व कोरोना विषाणू संसर्गामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना जिल्ह्यात येता आले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना नऊ महिने दुरावा सहन करावा लागला. मात्र, या दुराव्यानंतर प्रथमच जिल्ह्यात पाऊल ठेवणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या स्वागतावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचला. 

कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघिन आली, या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. परतीच्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेवराई हद्दीत प्रवेश करताच त्यांचे भाजप संघटना व पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. आमदार लक्ष्मण पवार, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, युवा नेते अक्षय मुंदडा, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उषा मुंडे, केशव आंधळे, गोविंद केंद्रे, प्रा. देविदास नागरगोजे, भगवान केदार आदींसह हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषपूर्व स्वागत केले. 

पंकजा मुंडे यांचा परळी मतदार संघातून मोठा पराभव झाला. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीतही त्यांची उमेदवारी टाळली. गोपीनाथगडावर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. मात्र, मी सिंहाची मुलगी असून शिकार करणार, घरात बसणार नाही, लोकांच्या प्रश्नांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करण्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यांनी औरंगाबादला आंदोलनही केले.

मात्र, नंतर कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाला आणि लॉकडाऊन लागले. त्यामुळे जिल्हा बंदी आदेश आणि संसर्गाची भिती यामुळे त्यांना जिल्ह्यात येता आले नाही. अगदी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जुनमधील पुण्यतिथीला पंकजा मुंडे येऊ शकल्या नाहीत. एकूणच या सर्व परिस्थितीमुळे दुरावा तर होताच शिवाय पक्षाकडून टाळले गेल्याने कार्यकर्तेही अस्वस्थ होते. अगदी भाजपच्या सरकार विरोधी आंदोलनातही मुंडे समर्थक चार हात दुर दिसले.

अखेर पंकजा मुंडे यांना भाजपने राष्ट्रीय सचिवपद देऊन सन्मान केला. आता अनलॉकही झाले आहे. मात्र, जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. अतिवृष्टीने नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंकजा मुंडे तीन दिवसांपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे त्या जिल्ह्यात पोचल्या. गेवराईच्या हद्दीत पाऊल ठेवताच नऊ महिन्यांच्या दुराव्यामुळे अस्वस्थ असलेल्या कार्यकर्त्यांत नवी उर्जा निर्माण झाली आणि महाराष्ट्राची वाघिन आली म्हणत त्यांचे त्याच जल्लोषात स्वागत झाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com