केबलच्या नावाखाली रस्त्यांवर वारेमाप खोदकाम करणाऱ्यांवर प्रशासक भडकले.. - Administrators lash out at windmill diggers on roads under the name of cable | Politics Marathi News - Sarkarnama

केबलच्या नावाखाली रस्त्यांवर वारेमाप खोदकाम करणाऱ्यांवर प्रशासक भडकले..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

शंभर कोटीहून अधिकचे रस्ते तयार झाले आहेत. तर १५२ कोटींच्या रस्त्यांची कामे देखील लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. पण केबल टाकण्याच्या नावाखाली खाजगी कंपन्या आणि एजन्सीचे कंत्राटदार चांगल्या रस्त्यांची वाट लावत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यामुळे मी स्वतः केबल टाकण्याचे काम रस्त्या कमी खोदून देखील कसे केले जाऊ शकते हे संबंधित कंत्राटदाराला दाखवण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद ः  शहरात कोट्यावधी रुपये खर्चून महापालिकेच्या वतीने रस्ते तयार करण्यात आले आहेत, तर आणखी दीडशे कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत. मात्र काही खाजगी कंपन्या आणि एजन्सीज केबल टाकण्याच्या नावाखाली रस्त्यांवर वारेमाप खोदकाम करून त्यांची वाट लावत असल्याने महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय चांगलेच भडकले आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कमी खोदकाम करून देखील केबल टाकता येऊ शकते याचे प्रात्यक्षिकच दाखवले.

शहरातील रस्त्यांची पावसामुळे आधीच वाट लागली आहे. तर दुसरीकडे चांगल्या रस्त्यांवर केबल टाकणे किंवा इतर कामांच्या नावाखाली संबंधित एजन्सी, कंपनीचे कंत्राटदार चांगल्या रस्त्यांची वाट लावत आहेत. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. केबल टाकण्यासाठी नाममात्र शुल्क भरून अनेक एजन्सी, कंपन्या शहराच्या विविध भागातील रस्ते खोदून ठेवतात. मुळात महापालिका या कामासाठी परवानगी देतांनाच रस्त्याचे कमीत कमी खोदकाम करून काम करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या जातात.

प्रत्यक्षात मात्र संबंधित कंपन्यांचे कंत्राटादर नव्या रस्त्यांचे अक्षरशः वाटोळे करतात, असा आरोप खुद्द महापालिकेच्या प्रशासकांनीच केला आहे. शिवाय असे प्रकार होऊ नये यासाठी त्यांनी आज स्वतः महापालिकेचे कर्मचारी सोबत घेतले आणि केबल टाकणाऱ्या कंपन्यांच्या कंत्राटदारांना बोलावून घेत रस्त्यावर कमी खोदकाम करून देखील केबल टाकण्याचे काम होऊ शकते, याचे प्रात्यक्षिक दाखवले. 

यावेळी बोलतांना पांडेय म्हणाले, शहरात नवीन रस्ते तयार करण्यासाठी राज्य सरकार महापालिकेला कोट्यावधींचा निधी देते. शहरात आतापर्यंत अशा निधीतून शंभर कोटीहून अधिकचे रस्ते तयार झाले आहेत. तर १५२ कोटींच्या रस्त्यांची कामे देखील लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. पण केबल टाकण्याच्या नावाखाली खाजगी कंपन्या आणि एजन्सीचे कंत्राटदार चांगल्या रस्त्यांची वाट लावत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यामुळे मी स्वतः केबल टाकण्याचे काम रस्त्या कमी खोदून देखील कसे केले जाऊ शकते हे संबंधित कंत्राटदाराला दाखवण्याचा प्रयत्न केला.

नागरिकांना चालण्यासाठी चांगले रस्ते असावेत यासाठी महापालिका मोठ्या प्रमाणावर कामे करीत आहे. पण जरा कुठे चांगला रस्ता झाला की त्यावर कुठल्या न कुठल्या कारणाने खोदकाम केले जाते. केबल व इतर काही आवश्यक कामांसाठी महापालिका शुल्क आकारून परवानगी देते, पण त्यानंतर रस्ता पुर्वीसारखाच करून देण्याची त्यात अट असते. पण अनेकदा केबलचे काम पुर्ण झाल्यानंतर संबंधित कंपनी किंवा एजन्सी थातूर-मातूर काम करून निघून जाते आणि चांगल्या रस्त्याचे वाटोळे होते. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही पांडेय यांनी यावेळी दिला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख