औरंगाबाद : सासर आणि माहेराकडून मिळाला राजकारणाचा वारसा - देवयानी डोणगांवकर 

Devyani Dongavkar
Devyani Dongavkar

औरंगाबाद : "माहेरी आणि सासरी राजकीय वातावरण असल्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणुक लढवण्यासाठी माझ्याकडे विचारणा  झाली तेव्हा मी तात्काळ होकार दिला. राजकारणाचे बाळकडु लहानपणापासूनच मिळाल्यामुळे राजकारण मला कधी नवे वाटलेच नाही ", अशा शब्दांत जिल्हा परिषद अध्यक्ष ऍड. देवयानी डोणगांवकर यांनी आपला राजकीय प्रवास उलगडला.

जिल्हा परिषदेचा म्हणजेच  मिनी मंत्रालयचा कारभार हाती घेतल्यानंतर आता पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, सिंचन आणि ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांतील कामांचा लेखाजोखा आणि भविष्यातील वाटचाली विषयी त्यांनी 'सरकारनामा'शी बातचीत केली. 

प्रश्‍न :    जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रस्ताव कसा आला? 
डोणगांवकर :  लासूर स्टेशन जिल्हा परिषद सर्कल महिला राखीव असल्यामुळे पती कृष्णा पाटील यांनी 'तुला निवडणूक लढवायची आहे', असे सांगितले. माझे  सासरे स्व. साहेबराव पाटील डोणगांवकर खासदार होते. ते स्वतः जिव्हा परिषद अध्यक्ष होते .  सासुबाई इंदुमती डोणगावकर या  जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राहिलेल्या आहेत .   पती कृष्णा पाटील हे देखील जिल्हा परिषद सदस्य होते .कृष्णा पाटील  गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते व  त्यांनी विधानसभा देखील लढवलेली आहे .   दुसरीकडे माझ्या माहेरी आजोबा धुळे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष होते . आजी आमदार होत्या . वडील जि.प. सदस्य, सभापती होते . तर आई देखील जिल्हा परिषदेची सदस्य राहिलेली आहे . माझे काका  डॉ . सुभाष भामरे सध्या केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री आहेत .  त्यामुळे सासर आणि माहेर आशा दोन्हीकडून राजकीय वारसा मिळाल्यामुळे मी निवडणुक लढवायला तयार झाले. 


प्रश्‍न  :  थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व्हाल असे वाटले होते का? 

डोणगांवकर  :  मला जेव्हा शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली तेव्हा फक्त निवडणूक लढवायची आणि जिंकायची एवढेच ध्येय डोळ्यासमोर होते. प्रचारा दरम्यान, मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या. निवडणूकीत विजय मिळाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळावे असे वाटत होते पण मिळेलच अशी खात्री नव्हती .  अध्यक्षपद मिळाले.  आता अध्यक्षपदाच्या माध्यमातून जनतेचे मुलभूत प्रश्‍न सोडवण्यावर मी भर देत आहे. 

प्रश्‍न  :  अध्यक्षपदाच्या सहा महिन्यानंतर परिस्थितीत काय बदल झाला? 

डोणगांवकर  :  मी अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील अखर्चित निधीचा मोठा प्रश्‍न समोर होता. नियोजनाचा अभाव, प्रशासकीय मान्यता नाही त्यामुळे निधी परत जाण्याचे प्रमाण खूप होते. पैसा आहे, पण तो जनतेसाठी खर्च होत नव्हता. बहुतांश विभागाची कामे ठप्प पडून होती. सहा महिन्यात वेग आला अस मी म्हणणार नाही, पण किमान ठप्प झालेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या सोबतीने मी निश्‍चितच केला आहे. 

प्रश्‍न   : आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठ्याचे प्रश्‍न जैसे थे आहेत? 

डोणगांवकर  :  अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हाच या तिन्ही विषयांकडे प्रामुख्याने लक्ष देणार असल्याचे मी पत्रकारांशी बोलतांना सांगितले होते. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आरोग्यासाठी निधीची कमतरता नाही, औषधी देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, पण अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत .    यामुळे ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचत नाहीत. ग्रामीण भागातील रुग्णांपर्यत औषधी वेळेत पोचली पाहिजेत . त्यासाठी   अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्याचा विचार आहे. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या  धर्तीवर आपल्याकडे तसा प्रयोग करता येईल का? याचा अभ्यास आम्ही करतो आहोत. या अंतर्गत रुग्णाला डॉक्‍टर आरोग्य केंद्रात तपासेल, त्याच्या आजारावरील औषधींची चिठ्ठी   स्कॅनरसमोर ठेवली की त्यातून औषधी मिळतील असा तो प्रयोग आहे. एटीएममधून औषधी देण्याचा हा अभिनव प्रयोग आहे. 


जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था वाईट आहे? 

डोणगांवकर :  शिक्षण आणि जिल्हा परिषदेच्या शाळांबद्दल बोलायचे झाले तर शिक्षकांची पद, शाळा खोल्यांची दुरुस्ती, पटसंख्या, शिक्षणाचा दर्जा आणि सोयीसुविधा यासाठी शासनाकडून अतिरिक्त निधीची आवश्‍यकता आहे. जिल्ह्यात 10 हजार वर्ग खोल्या आहेत. त्यापैकी निम्या मोडकळीस आल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

प्रश्‍न  :  पाऊस पडूनही जिल्ह्यात टॅंकर सुरु आहेत? 

डोणगावकरः भारत निर्माण योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कोट्यावधींचे कामे जिल्ह्यात झाली, काही अपुर्ण आहेत. पण ज्या जलस्त्रोताच्या आधारावर योजना राबवण्यात आल्या त्या प्रकल्पातच गेल्या आठ दहा वर्षापासून पाणी नाही अशी परिस्थीती आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून देखील टेभांपुरी, शिल्लेगांव, बोर दहेगांव प्रकल्पात अनेक वर्षांपासून पाणी आलेले नाही. एवढा पाऊस पडला तरी जिल्ह्यातील 55 गावात 56 टॅंकरमधून 122 फेऱ्याद्वारे पाणी पुरवावे लागते. पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी जायकवाडी, नांदूरमधमेश्‍वर आणि खडकपुर्णा धरणातून वॉटरग्रीडच्या माध्यामातून गावातील पाणीपुरवठा योजना, विहिरीत पाणी आणण्याचा प्रस्ताव आम्ही राज्य सरकारला देणार आहोत.

प्रश्‍न  :  सिंचन आणि समाजकल्याणचा निधी मोठ्या प्रमाणात पडून आहे? 

डोणगांवकर :  दोन वर्षापासून डीपीडीसीकडून मिळालेल्या 58 पैकी 51 कोटींचा निधी खर्चाविना पडून आहे. यात प्रामुख्याने सिंचन व समाजकल्याण विभागाच्या योजनांचा समावेश आहे. सिंचनाच्या जुन्या रखडलेल्या योजना पुर्ण करणे गरजचे असल्यामुळे यावर्षी नवी कामे हाती घेताच येणार नाही अशी परिस्थिती  आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या दलित वस्तीच्या मान्यतेसाठी तर आम्हाला सत्ताधारी असून आंदोलन करावे लागले. जिल्ह्यातील  50 गावे अशी आहेत ज्या गावांमध्ये एक दमडाही अद्याप खर्च करण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे घडले आहे. प्रशासनाला कामाला लावून हा अखर्चित निधी लवकरात लवकर कसा खर्च होईल याचे नियोजन सुरु आहे. यापुढे जिल्हा परिषदेचा निधी परत जाणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. 

प्रश्‍न  :  जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचा प्रश्‍न रखडला आहे? 

डोणगांवकर  :  सध्याची इमारत शंभर वर्षापुर्वीची आहे. जिल्हा परिषदेचा वाढलेला कारभार पाहता नव्या इमारतीची आवश्‍यकता लक्षात घेऊन पुढाल महिन्यात औरंगाबादेत होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत नवीन इमारतीचा 30 ते 35 कोटी रुपयांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे देणार आहोत. घाटी रुग्णालयासमोरील जि.प.च्या 4 एकर जागेवर ही इमारत उभारण्यात येईल.

:

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com