औरंगाबाद जिल्हा परिषदेचा कारभार महिलेच्याच हाती ; सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण जाहीर

 औरंगाबाद जिल्हा परिषदेचा कारभार महिलेच्याच हाती ; सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण जाहीर

औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे आगामी अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. मुंबई येथे मंगळवारी (ता. 19 ) आरक्षणाची सोडत काढण्यात आले. विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांची वाढीव मुदत 22 जानेवारीला संपणार आहे. यानंतर नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल. जिल्हा परिषदेत शिवसेना व कॉंग्रेस आघाडी आहे. आगामी अध्यक्षपदही शिवसेनेकडेच राहण्याची शक्‍यता आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या गटातून निवडून आलेल्या शिल्पा कापसे, शितल बनसोड, स्वाती निरफळ, वैशाली पाटील, पार्वताबाई जाधव यापैकी अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

विद्यमान अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांची मुदत 21 सप्टेबर रोजी संपली होती. त्यानंतर शासनने त्यांना चार महिन्याची मुदतवाढ दिली होती. औरंगाबाद जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि कॉंग्रेसने हातमिळवणी करत जिल्हा परिषदेत वेगळ्या राजकीय समीकरणाला सुरूवात केली होती. या दोन पक्षात झालेल्या करारानुसार अध्यक्षपद शिवसेनेला तर उपाध्यक्षपद कॉंग्रेसकडे होते. शिवसेनेने ऍड. देवयानी डोणगांवकर यांना अध्यक्षपदाची संधी दिली, तर कॉंग्रेसकडून केशवराव तायडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसची साथ सोडून भाजपला सत्तेत सहभागी करून घेण्याची मागणी भाजपच्या सदस्यांनी लावून धरली होती. पण त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा युतीत बिनसल्यामुळे जिल्हा परिषदेतील परिस्थीती जैसे थे राहण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हापरिषदेत महाशिवआघाडी? 

जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणारे तत्कालीन कॉंग्रेस आमदार व जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार आता शिवसेनेत दाखल झाले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. राज्यात शिवसेना-भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्रीपदावरून युतीत फूट पडली आहे. शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महाशिवआघाडीच्या नावाखाली येत्या आठवडाभरात राज्यात सरकार स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

राज्यात महाशिवआघाडीचे सरकार सत्तारूढ झाले तर त्याचे राजकीय परिणाम महापालिका आणि जिल्हा परिषदेतील सत्तेवर देखील होणार आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत महाशिवआघाडीचा प्रयोग झाला तर मात्र भाजपला पुन्हा विरोधी बाकावरच बसावे लागेल. जिल्हा परिषदेत भाजपचे सर्वाधिक 23, शिवसेना 18, कॉंग्रेस 16, मनसे 1 व रिपब्लिकन डेमाक्रॅटीक पक्षाचा एक असे 61 सदस्य आहेत. 62 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत शिवसेनेचे प्रा. रमेश बोरणारे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यामुळे त्यांनी जिल्हापरिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com