औरंगाबाद जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला कॉंग्रेसकडून खो ?

औरंगाबाद जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला कॉंग्रेसकडून खो ?

औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून शब्द पाळला जाणार नाही असे दिसताच कॉंग्रेसने महाविकास आघाडीला खो देण्याची तयारी चालवली आहे. कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर गेली अडीच वर्ष शिवसेनेने जिल्हा परिषद अध्यक्षपद भोगले. तेव्हाच " आमचं ठरलं होत' असे सांगत कॉंग्रेसने अध्यक्षपदासह सेनेकडे असलेल्या सभापती पदांवर देखील दावा सांगितला आहे. शिवसेना मात्र कॉंग्रेसला ही पद देण्यास इच्छूक नसल्याचे बोलले जाते. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने भाजपला सोबत घेत अध्यक्षपद पटकावण्याच्या हालचाली सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता हाच पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्यांचा अध्यक्ष हा नवा फॉर्म्युला त्यासाठी ठरवण्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु महाविकास आघाडी आता अस्तित्वात आली आहे, जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदासह इतर पदांचे वाटप आधीच ठरले होते असा पावित्रा कॉंग्रेसने घेतला आहे. 

जिल्हा परिषदेत सर्वाधिक 23 सदस्य भाजपकडे, शिवसेना-18, कॉंग्रेस-16, राष्ट्रवादी-3 मनसे-1, डेमोक्राटीक -1असे पक्षीय बलाल आहे. शिवसेनेने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेसची मदत घेत आपला अध्यक्ष केला होता. आता कॉंग्रेसने अध्यक्षपदावर दावा सांगत शिवसेनेला दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली आहे. 

माजी अध्यक्षांनी घेतली जबाबदारी... 
तत्कालीन कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे श्रीराम महाजन यांनी यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपद भुषवले होते. भराडी सर्कलमधून निवडूण आलेल्या महाजन यांनी यावेळी सगळी सूत्र आपल्या हाती घेतल्याचे समजते. कॉंग्रेससह अन्य दोन अशा आठ सदस्यांना सोबत घेऊन महाजन सध्या अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. या शिवाय कॉंग्रेसचे सहा सदस्य हे जिल्हा कॉंग्रेस समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या सोबत आहेत. 

शिवसेनेकडून दगाफटका झाला तर थेट भाजपशी हातमिळवणी करत अध्यक्षपद मिळवण्याची रणनिती कॉग्रेसकडून आखण्यात आली आहे. शिवसेनेने शब्द पाळला नाही तर आम्हाला अन्य पर्यायांचा विचार करावा लागेल असा सूचक इशारा कल्याण काळे यांनी नुकताच दिला होता. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसकडून स्वतंत्रपणे लढण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

भाजप उट्टे काढण्याच्या तयारीत ? 
राज्याच्या सत्तेत कॉंग्रेस शिवसेनेसोबत गेली असली तरी, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप कॉंग्रेसला साथ देण्याच्या तयारीत आहे. सर्वाधिक सदस्य असून अडीच वर्ष भाजपला सत्तेपासून रोखणाऱ्या शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्याची चालून आलेली ही संधी भाजप साधणार असे दिसते. अगदी त्यासाठी अध्यक्षपद 16 सदस्य असलेल्या कॉंग्रेसला द्यावे लागले तरी भाजपच्या स्थानिक नेत्यांची तयारी असल्याची माहिती आहे. भाजपच्या पाठिंब्यावर कॉंग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि भाजपचा उपाध्यक्ष असे सूत्र दोन्ही पक्षाकडून स्वीकारले जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 3 जानेवारी रोजी नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मात्र राज्य पातळीवर अद्याप महाविकास आघाडी संदर्भात निर्णय झालेला नाही. स्थानिक पातळीवर देखील शिवसेना- कॉंग्रेस यांच्यात संवाद नाही. त्यामुळे कॉंग्रेसने आपला बी प्लान तयार केल्याचे बोलले जाते. राज्यमंत्रिमंडळ विस्तारानंतर वरिष्ठ नेते जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात लक्ष घालतील आणि मार्ग निघेल अशी आशा शिवसेना आणि कॉंग्रेसचे नेते बाळगून आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com