सभापतिपदाचा शब्द मिळाल्यावर भुमरेंची माघार

सभापतिपदाचा शब्द मिळाल्यावर भुमरेंची माघार

औरंगाबाद ः जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पैठण तालुक्‍यालाच मिळावे असा आग्रह धरत वेगळा विचार करण्याचा इशारा तालुक्‍यातील नवनिर्वाचित सदस्यांनी दिला होता. या मागे आमदार संदीपान भुमरे यांचाच हात होता असेही बोलले जात होते. त्याला दुजोरा देणारी बाब समोर आली आहे. संदीपान भुमरे यांनी पुत्र विलास यास जिल्हा परिषदेत सभापतिपद मिळावे असा शब्द शिवसेना नेत्यांकडून मिळवला आणि मगच अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची चर्चा आहे. पुत्र प्रेमापोटी भुमरे यांनी तालुक्‍यातील अन्य सदस्यांवर अन्याय केल्याची भावना तालुक्‍यातील शिवसैनिक बोलून दाखवत आहेत. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वाधिक सदस्य निवडून आलेल्या पैठण तालुक्‍याला मिळावे अशी मागणी लावून धरण्यात आली होती. कॉंग्रेसशी हातमिळवणी करून शिवसेनेने अध्यक्षपद मिळवण्याची तयारी सुरू केली असतानाच पैठणच्या सदस्यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने पक्षात खळबळ उडाली. मात्र शिवसेनेच्या धुरीणांनी सदस्यांसह आमदार संदीपान भुमरे यांची समजूत काढली, शिवाय त्यांचे पुत्र विलास यांना सभापतिपद देण्याचे मान्य केले. त्यामुळे पैठणच्या सर्व सदस्यांनी शिवसेनेच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांना मतदान केले आणि त्या 34 मतांनी विजयी झाल्या. 

गंगापूरच्या अध्यक्षपदामागे लोकसभेचे गणित 
कॉंग्रेसशी युती करुन शिवसेनेचा अध्यक्ष करण्यामागे भाजपला रोखण्याचा प्रयत्न तर होताच शिवाय खैरे यांच्या 2019 मधील लोकसभा निवडणुकीचे गणित देखील होते. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला गंगापूर तालुका ढासळायला लागला. माजी आमदार अण्णासाहेब माने, विधानसभा लढवून पराभूत झालेले जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या वादात भाजपने तालुक्‍यात आपली ताकद वाढवली. नगरपालिका, पंचायत समितीमध्ये भाजपचे वर्चस्व राहिल्याने याचा फटका लोकसभेत बसू शकतो याचा अंदाज आल्यानेच कृष्णापाटील डोणगांवकर यांचा शिवसेनेत प्रवेश आणि त्यांच्या पत्नी देवयानी यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आल्याची चर्चा आहे. या उलट अध्यक्षपदावर दावा सांगणारा पैठण तालुका हा चंद्रकांत खैरे यांच्या लोकसभा मतदारसंघात नाही. जालना मतदारसंघाला हा तालुका जोडल्यामुळे पैठणला अध्यक्षपद देण्यात खैरे यांना रस नव्हता, आणि घडलेही तसेच. 
सभापतिपदासाठी लॉबिंग 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या देवयानी डोणगांवकर विराजमान झाल्यानंतर आता चार सभापतीपदांपैकी शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या दोन पदांवर वर्णी लागावी यासाठी सदस्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. महत्त्वाचे खाते मिळावे यासाठी नेत्यांकडून जोर लावण्यात येत असला तरी सत्तेत समान वाटेकरी असलेल्या कॉंग्रेसला विश्‍वासात घेऊनच कोणत्या पक्षाकडे कोणते सभापतिपद द्यायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. येत्या 4 एप्रिल पर्यंत सभापती पदाची निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com