aurangabad zp | Sarkarnama

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 मार्च 2017

औरंगाबाद ः कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मिळणारे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. ओबीसी महिलेसाठी आरक्षित असलेल्या या पदावर आपल्याच समर्थकांची वर्णी लागावी यासाठी शिवसेनेतील खैरे, दानवे गट तयारीला लागले आहेत. पिशोर गटातून शिवसेनेचे कन्नड येथील आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना यांचा पराभव करत निवडून आलेल्या शुभांगी काजे, राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या कृष्णा पाटील डोणगांवकर यांच्या पत्नी देवयानी व पैठण तालुक्‍यातील पिंपळवाडी गटातून विजयी झालेल्या मनीषा सोलाट यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. 

भाजपला रोखण्यासाठी कॉंग्रेसशी हातमिळवणी करत पंचायत समितीत नव्या समीकरणाचा पायंडा पाडल्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यासाठी शिवसेनेतील ओबीसी महिला सदस्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. कॉंग्रेस सोबत जाण्याच्या निर्णयात पालकमंत्री रामदास कदम व खासदार चंद्रकांत खैरे यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे अध्यक्षपदाचा उमेदवार देखील खैरे गटाचाच राहणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव आणि खैरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. शिवसेनेच्या नेत्यांना डावलून जाधव यांनी पूर्वी नगरपालिका आणि आता जिल्हा परिषदेत देखील स्वतंत्र विकास आघाडी करून निवडणूक लढवली. कन्नड तालुक्‍यातील पाच गटात त्यांचे उमेदवार विजयी देखील झाले. मात्र पत्नी संजना जाधव यांचा पिशोर गटातून शिवसेनेच्या शुभांगी काजे यांनी पराभव केला. काजे या खैरे समर्थक म्हणून ओळखल्या जातात. आमदाराच्या पत्नीचा पराभव केल्याचे बक्षीस म्हणून अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची अधिक शक्‍यता वर्तवली जात आहे. 

कृष्णा पाटील डोणगांवकर यांच्या पत्नी व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या कन्या ऍड. देवयानी डोणगांवकर यांचे नाव देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. पण कृष्णा पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाला तो 2019 मध्ये गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून. त्यामुळे देवयानी डोणगांवकर यांना इतक्‍यात शिवसेनेकडून अध्यक्षपद दिले जाईल असे वाटत नसल्याची चर्चा आहे. तिसरे नाव पैठण तालुक्‍यातील पिंपळवाडीच्या नवनिर्वाचित सदस्य मनीषा सोलाट यांचे आहे. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे जिल्हा परिषदेवर सात तर पंचायत समितीवर 11 सदस्य पैठणमधून निवडून आले आहेत. पंचायत समितीचे सभापतिपद देखील शिवसेनेकडेच आहे. पक्षाला मोठ्या प्रमाणात यश मिळवून देणारा तालुका म्हणून अध्यक्षपद सोलाट यांना द्यावे असा दावा तालुक्‍यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 
खैरे सांगतील तोच अध्यक्ष 
खासदार खैरे सांगतील तोच उमेदवार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. आता खैरे आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकतात हे 21 मार्च रोजीच स्पष्ट होईल. उपाध्यक्षपद कॉंग्रेसकडे जाणार असून त्यासाठीचा उमेदवार कॉंग्रेसने अद्याप निश्‍चित केलेला नाही. आमदार अब्दुल सत्तार किंवा माजी आमदार कल्याण काळे यांच्या फुलंब्री मतदारसंघातील सदस्याची या पदावर वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. याशिवाय सदस्य संख्येच्या आधारावर सभापतीपदांचे वाटप ठरवण्यात येणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख