शिवसेनेत चर्चा : औरंगाबाद पश्चिममध्ये हर्षवर्धन जाधवांना 38 हजार मते पडलीच कशी ? 

या मतदारसंघात झालेल्या एकूण एक लाख 93 हजार एकशे 99 मतांपैकी खैरे यांना 77 हजार 274 तर इम्तियाज जलील यांना 71 हजार 239 इतकी मते पडली आहेत.
Shirsat-Jadhav-
Shirsat-Jadhav-

औरंगाबाद: अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात 38 हज़ार मते पडल्याने शिवसेनेच्या गोटात आश्चर्य व्यक्त केले जात आहे . त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्यासमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे . 

लोकसभा निवडणुकीत शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील पश्चिम व वैजापूर विधानसभा मतदारसंघ वगळता शिवसेना-भाजप युतीची पीछेहाट झाली आहे. शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला नेहमीच आघाडी घेणाऱ्या शिवसेनेला यावेळी मात्र जेमतेम साडेसहा हजारांची आघाडी मिळाली आहे. आमदार संजय शिरसाठ हे या मतदारसंघाचे सलग दोन टर्मपासून प्रतिनिधित्व करतात.

 पश्चिम मधून वंचित बहुजन आघाडीचे इमतियाज जलील यांना मिळालेल्या मतांवर नजर टाकली तर शिवसेनेची इथे बऱ्यापैकी पीछेहाट झाल्याचे दिसून येते. या मतदारसंघात झालेल्या एकूण एक लाख 93 हजार एकशे 99 मतांपैकी खैरे यांना 77 हजार 274 तर इम्तियाज जलील यांना 71 हजार 239 इतकी मते पडली आहेत.  गेल्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघात शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना 35 हजार 828 मते पडली होती . 

शहरातील तीन मतदारसंघांपैकी पश्चिम मधून शिवसेनेला सर्वाधिक लीड मिळेल असा अंदाज होता. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराला पडलेली मत ही खूपच कमी आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच लोकसभा लढवणाऱ्या अपक्ष हर्षवर्धन जाधव यांनी पश्चिम मध्ये 38000 मते घेत शिवसेनेला चांगलाच दणका दिला. हर्षवर्धन जाधव यांना एवढी मते कशी पडली याची शिवसेनेत चर्चा आहे . 

निवडणूक प्रचारा दरम्यानच्या भाषणांमध्ये संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांना पश्चिम मधून सर्वाधिक लीड देत तुम्ही केंद्रात मंत्री होणार अशा शुभेच्छा दिल्या होत्या, प्रत्यक्षात घडले उलटेच. गेल्या लोकसभा निवडणुकीतील 35 हजारांचे मताधिक्य थेट साडेसहा हजारांवर आल्याने चंद्रकांत खैरे यांच्यासाठी जसे नुकसानीचे ठरले तसेच ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाठ यांच्यासाठी देखील अडचणीचे ठरणारे आहे

शिरसाठ काय डावपेच लढवणार ?

लोकसभा निवडणुकीत पश्चिम मधून शिवसेनेचे मताधिक्य गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घटल्यामुळे संजय शिरसाट सावध झाले आहेत. आगामी  विधानसभा निवडणुकीत पश्चिम मतदारसंघात हॅट्रिक साधायची असेल तर शिवसेनेला आत्तापासूनच जोर लावावा लागेल. उरलेल्या चार पाच  महिन्यात संजय शिरसाट पॅचअप कसे करणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्यावेळी  संजय शिरसाट सहा हजार मतांनीच निवडून आले होते . 

दुसरीकडे वंचित आघाडीला मिळालेले यश पाहता हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांच्याकडून जोरदार प्रयत्न होण्याची शक्यता आहे.  2014च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम पुरस्कृत गंगाधर गाडे यांनी  35 हजारांहून अधिक मते मिळवली होती.

आता सोबतीला वंचित आघाडी असल्यामुळे एमआयएमची ताकद पश्चिम मध्ये जवळपास दुप्पट झाल्याचे लोकसभेत झालेल्या मतांच्या कडेवरून स्पष्ट झाले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com