Aurangabad Shiv Sena Chandrakant Khaire Ramdas Kadam | Sarkarnama

शिवसेनेची पीछेहाट कदमांमुळेच : चंद्रकांत खैरे 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 मार्च 2017

औरंगाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत शिवसेनेवर कुरघोडी केली. गेल्या निवडणुकीपेक्षा शिवसेनेची एक जागा कमी झाली तर भाजपची संख्या 6 वरुन थेट 23 वर गेली. शिवसेनेची पीछेहाट झाली यापेक्षा भाजपचे बळ वाढले याचे दुःख शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना होत आहे. या अपयशाचे खापर अखेर पालकमंत्री रामदास कदम यांच्या माथी फोडण्यात आले आहे.

औरंगाबाद : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत शिवसेनेवर कुरघोडी केली. गेल्या निवडणुकीपेक्षा शिवसेनेची एक जागा कमी झाली तर भाजपची संख्या 6 वरुन थेट 23 वर गेली. शिवसेनेची पीछेहाट झाली यापेक्षा भाजपचे बळ वाढले याचे दुःख शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना होत आहे. या अपयशाचे खापर अखेर पालकमंत्री रामदास कदम यांच्या माथी फोडण्यात आले आहे.

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनीच ते फोडले. परस्पर काटा निघत असल्याने दोन्ही जिल्हाप्रमुख, आमदारांनी मग केवळ बघ्याची भूमिका घेत या आगीत तेल ओतण्याचे काम केले. त्यामुळे आधीच छत्तीसचा आकडा असलेल्या खैरे-कदम यांच्यातील वाद आणखीन चिघळणार यात शंका नाही 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा परिचय व स्वागत समारंभ शिवसेनेच्या वतीने शहरातील एका हॉटेलात ठेवण्यात आला होता. शिवसेनेला मागे सारत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरल्याचे व अध्यक्षपदाला मुकावे लागण्याचे शल्य या सोहळ्यात व्यक्त होणार याचा अंदाज आधीच आला होता. अपेक्षेप्रमाणे सदस्यांचे स्वागत झाल्यानंतर खैरे यांनी माईकचा ताबा घेतला आणि आपला दांडपट्टा सुरू केला. मुंबईचे नेते प्रचारासाठी फिरकले नाही असा तक्रारीचा सूर काढत सुरू झालेले खैरेंचे भाषण पालकमंत्री रामदास कदमांवर येऊन ठेपले. 

आम्ही पैशाने कमी पडलो 
भाजपने प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीसाठी 15 लाख रुपये वाटल्याचा आरोप खैरे यांनी निवडणुकीपूर्वीच केला होता. तोच धागा पकडत शिवसेनेने मात्र उमेदवारांना निधीच दिला नाही, आम्ही पैशाने कमी पडलो, म्हणूनच पीछेहाट झाली अशी कबुली खैरे यांनी भाषणात दिली. त्याचवेळी पालकमंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना पैसे द्यायला हवे होते असे म्हणत त्यांनी पक्षाच्या खराब कामगिरीचे खापर कदमांच्या डोक्‍यावर फोडले.

मी मंत्री असताना प्रत्येक निवडणुकी उमेदवारांना पैशाची मदत करायचो, पण यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. पालकमंत्र्यांनी ही व्यवस्था करायला हवी होती. प्रचारात शिवसेनेने आघाडी घेतली होती, वातावरण चांगले होते पण शेवटच्या दोन दिवसांत भाजपने पाण्यासारखा पैसा वाटला असा आरोप देखील खैरे यांनी आपल्या भाषणात केला.

जिल्हा परिषद निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर सोपवावी आणि रामदास कदम यांना प्रचाराला सुद्धा पाठवू नका अशी मागणी खैरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती अशी चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात होती. मात्र खैरे विरोधकांनी शेवटच्या टप्यात कदमांना आणून प्रचार सभा घेतल्याच. याचा राग खैरे यांनी अपयशाचे धनी कदमांना ठरवून काढल्याचे शिवसेनेत बोलले जाते. खैरे यांच्या या टीकेला आता भाई कसे उत्तर देतात याकडे त्यांचे समर्थक व खैरे विरोधकांचे लक्ष लागले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख