Aurangabad Raosaheb Danve BJP Beed | Sarkarnama

रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या शाही लग्न सोहळ्याचीच चर्चा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 मार्च 2017

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे आमदार पुत्र संतोष यांचा शाही विवाह सोहळा औरंगाबादेत आज (ता. 2) सायंकाळी होत आहे. आठवडाभरापासून बीड बायपास मार्गावरील विस्तीर्ण मैदानावर या डोळे दिपवून टाकणाऱ्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती.

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे आमदार पुत्र संतोष यांचा शाही विवाह सोहळा औरंगाबादेत आज (ता. 2) सायंकाळी होत आहे. आठवडाभरापासून बीड बायपास मार्गावरील विस्तीर्ण मैदानावर या डोळे दिपवून टाकणाऱ्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती.

दानवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका ते जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीत भाजपला जोरदार यश तर मिळालेच शिवाय पक्ष राज्यात नंबर एकचा बनला. त्यामुळे मुलाच्या लग्नाचा आणि पक्षाला मिळालेल्या यशाचा असा दुहेरी आनंद दानवे सध्या घेत आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या मुलाचे लग्न म्हटल्यावर या घरच्या कार्यात केंद्रातील मंत्र्यांसह भाजपचे राज्यातील अख्खे मंत्रिमंडळ वऱ्हाडी म्हणून सहभागी होणार आहे. 35 पेक्षा जास्त मंत्री, त्यांचे सचिव, खासदार, आमदार, नगराध्यक्ष, वरिष्ठ अधिकारी यांच्यासह मतदारसंघातील हजारो नागरिक या विवाह सोहळ्याला आवर्जून हजेरी लावणार आहेत. 

नवदाम्पत्यांना आर्शिवाद देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, रामदास आठवले, हंसराज अहीर, सुभाष भामरे, राज्याचे सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुभाष देशमुख, जयकुमार रावल, पंकजा मुंडे , विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, गिरीश बापट, गिरीश महाजन, संभाजीराव पाटील निलंगेकर, विष्णू सावरा, प्रा. राम शिंदे, राजकुमार बडोले, विद्या ठाकूर, सदाभाऊ खोत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे पाटील, राजे अंबरीशराव, रणजित पाटील आदी 35 पेक्षा अधिक मंत्री येणार आहेत. 

पंचतारांकित हॉटेल बुक 
मुलाच्या लग्नासाठी निमंत्रित मंत्री व विविध पक्षाच्या नेत्यांची व्यवस्था शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी दोन दिवसापासून शहरातील प्रमुख हॉटेलमधील खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. या विवाह सोहळ्यासाठी काही मंत्री कालच शहरात दाखल झाले आहेत. 

दानवे यांच्या मुलाच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती या लग्नावर होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चामुळे. एकीकडे राज्यातील भाजप सरकार विवाह समारंभावर होणाऱ्या अनाठायी खर्चाला लगाम घालण्यासाठी लग्नामध्ये पाचशे पेक्षा अधिक वऱ्हाडींना बोलवू नका, जेवणाचा खर्च व नासाडी टाळण्यासाठी मर्यादित लोकांचे जेवण व मेन्यू मोजकाच असावा यासाठी कायदा करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे खासदार व प्रदेशाध्यक्ष मात्र मुलाच्या लग्नावर करोडो रुपये खर्च करत आहेत. दानवे यांच्या मुलाच्या विवाहाची व्यवस्था चोख असावी यासाठी लाखो रुपये खर्चून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे. वऱ्हाडी व पाहुुण्या मंडळींसाठी अनेक पदार्थांचा समावेश असलेली जेवणाची थाळी, वरातीसाठी खास मागवण्यात आलेली घोडा गाडी, राजवाडा वाटावा असे स्टेज आणि डेकोरेशन असा थाटमाट करण्यात आला आहे. विमानतळापासून विवाह स्थळापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्यात आले असून दुपारपासूनच बीड बायपासकडे जाणाऱ्या इतर वाहतुकीवर पोलिसांनी नियंत्रण आणले आहे. 

अडीच लाख लोकांना निमंत्रण 
दानवे यांच्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण मतदारसंघासह अडीच लाख लोकांना पाठवण्यात आल्याचे कळते. दहा प्रकारच्या पत्रिका त्यासाठी छापण्यात आल्या असून भोकरदन व जालना मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला या लग्नाचे आमंत्रण देण्यात आले आहे. भोकरदन व दानवे यांचे मूळ गाव असलेल्या जवखेड्यात तीन दिवसांपासून विविध कार्यक्रम व जेवणावळी सुरू आहेत. 

युतीतील तणावामुळे शिवसेनेची पाठ 
मुंबई महापालिकेतील महापौरपदाच्या निवडीवरून शिवसेना-भाजप यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या मंत्री व नेत्यांनी दानवेंच्या घरच्या लग्नाकडे पाठ फिरवली आहे. महापालिकेचे मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दानवे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर येथील शिवसेना आमदाराच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावणे पसंत केले. औरंगाबाद येथील शिवसेनेचे स्थानिक खासदार, आमदार व जिल्हाप्रमुख या विवाह सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्‍यता आहे. रावसाहेब दानवे यांच्या जालना मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार व राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे देखील या लग्नाला अनुपस्थित राहणार असल्याचे कळते. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी शहरातील सिमेंट रस्त्याच्या उद्‌घाटन समारंभ व श्रेय लाटण्यावरुन या दोघांमध्ये बरीच वादावादी झाली होती. तेव्हापासून एकाच जिल्ह्यात असून देखील हे दोन नेते एकत्र आलेले नाहीत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख