अंबादास दानवे : सामान्य कार्यकर्ता ते आमदार 

स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आमदारकीची माळ दानवे यांच्या गळ्यात पडली अन्‌ एक सामान्य कार्यकर्ता आमदार झाला, अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्य शिवसैनिकामध्ये उमटली. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या निसटत्या पराभवानंतर खचलेल्या शिवसैनिकांमध्ये दानवेंच्या विजयामुळे उत्साह संचारला आहे.
अंबादास दानवे : सामान्य कार्यकर्ता ते आमदार 

औरंगाबाद : भाजपच्या मुशित घडलेल्या अंबादास दानवे यांनी 1998 मध्ये शिवसेनेत प्रवेश करत गेली 16 वर्षे जिल्ह्यातील संघटन मजबूत केले. मात्र, नगरसेवक व सभागृह नेता वगळता मोठे पद त्यांच्या वाट्याला आले नव्हते. अखेर बुधवारी (ता. 22) स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आमदारकीची माळ दानवे यांच्या गळ्यात पडली अन्‌ एक सामान्य कार्यकर्ता आमदार झाला, अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्य शिवसैनिकामध्ये उमटली. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या निसटत्या पराभवानंतर खचलेल्या शिवसैनिकांमध्ये दानवेंच्या विजयामुळे उत्साह संचारला आहे. 

महाविद्यालयीन जीवनात एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळख असलेल्या अंबादास दानवे यांनी सुरवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले. 1989-90 साली ते भाजयुमोचे जिल्हा सचिव झाले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी त्यांची वर्णी लागली. 1995 पर्यंत या पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर 1995 मध्येच सिल्लोड विधानसभा मतदार संघातील भाजपचे तत्कालीन उमेदवार किसनराव काळे यांचे प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले व काळे आमदार झाले. काही नेत्यांसोबत मतभेद झाल्यानंतर दानवे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. 

शिवसेनेत प्रवेश
दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत 1998 मध्ये दानवे यांनी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान 2000 मध्ये ते अजबनगर वॉर्डातून निवडून आले. सभागृहनेतापदी निवड झाली. मात्र, सर्वसाधारण सभेत पक्षविरोधी प्रश्‍न विचारल्यावरून त्यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात आला व तेव्हापासून म्हणजेच 2004 पासून ते संघटना बांधणीचे काम करत आहेत. 

2009 मध्ये त्यांनी गंगापूर विधानसभा मतदार संघातून नशीब अजमावले मात्र प्रशांत बंब यांनी त्यांचा 17 हजार 278 मतांनी पराभव केला. सुरवातीला प्रभारी जिल्हाप्रमुख व त्यानंतर 16 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून उल्लेखनीय काम करणारे दानवे थेट मातोश्रीच्या संपर्कात होते. त्यामुळेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी दानवे यांचे नाव अंतिम केल्याचे सांगितले जाते. थेट पक्ष प्रमुखांच्या आदेशामुळे सर्वच शिवसेना नेत्यांनी व्यक्तिगत लक्ष घालत दानवे यांच्या विजयासाठी फिल्डींग लावली. 

देवगिरी महापालिद्यालयातून कला शाखेची पदवी घेतलेले दानवे यांनी राज्याच्या मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळविले होते. दरम्यान त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युकेशनची पदवी घेत गोल्ड मेडल मिळवले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com