महापालिकेत राजकीय हस्तक्षेप असतोच, पण तरीही बदल घडवू - आस्तीक कुमार पांडेय

.....
महापालिकेत राजकीय हस्तक्षेप असतोच, पण तरीही बदल घडवू - आस्तीक कुमार पांडेय

औरंगाबाद : राज्यात कुठेही जा, महापालिकांच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप असतोच, तरीही जनतेच्या सहकार्याने बदल घडवू असा विश्‍वास व्यक्त करतांनाच महापालिका आयुक्त आस्तीक कुमार पांडेय यांनी पहिल्याच दिवशी राजकारण्यांना टोला लगावला. औरंगाबाद महापालिकेत आयुक्त म्हणून यायला कुठलाच अधिकारी फारसा उत्सुक नसतो हा आतापर्यंतचा अनुभव. याआधीचे महापालिका आयुक्त डॉ. निपूण विनायक यांनी देखील राजकीय हस्तक्षेपावर नाराजी व्यक्त करत महापालिकेत येणेच बंद केले होते. त्यानंतर आज महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतांनाच नव्या आयुक्तांनी देखील राजकीय हस्तक्षेपाचा उल्लेख आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत आवर्जून केला. 

पांडेय म्हणाले, शहराला ऐतिहासिक वारसा असून, गतवैभव परत मिळविण्याची गरज आहे. त्यासाठी आगामी काळात काम करू. राज्यात कुठेही जा, राजकीय महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप असतोच. महापालिकेत अनेक प्रश्‍न आहेत, ते प्रश्‍न एका दिवसात सुटणार नाहीत; मात्र बदल घडविण्याचे आपले ध्येय असून, त्यासाठी नागरिकांचे सहकार्यदेखील आवश्‍यक आहे. "दिवसभरात अनेक नगरसेवक, पदाधिकारी भेटले. महापालिकेची वसुली कमी असल्याने विकास कामे ठप्प आहेत. ही कामे महापालिका निवडणुकीपूर्वी मार्गी लागावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आर्थिक शिस्त लावणे, स्मार्ट सिटीची कामे, शासनाने मंजूर केलेली 1,680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, बीओटी प्रकल्प मार्गी लावण्याच्या कामाला आपले प्राध्यान्य राहील. 

महापालिकेचे प्रश्‍न सर्वांनाच माहीत आहेत. त्यात आपण बदल घडवू. शहराला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न असेल, प्राधान्य ठरवून कामे केली जातील असे स्पष्ट करतांनाच राजकीय हस्तक्षेपावर कसा तोडगा काढणार? या प्रश्‍नावर, कुठेही जा; हीच परिस्थिती कायम आहे. त्यावर आज बोलणार नाही. पुढे पहा काय होतेय' असा सूचक इशाराही आयुक्त पांडेय यांनी यावेळी दिला. 

शहराचा कचरा होऊ देणार नाही 
शहरावर कचऱ्याचे मोठे संकट उभे राहिले होते; मात्र आज ती परिस्थिती राहिली नाही. चारपैकी एक प्रकल्प पूर्ण झाला आहे. उर्वरित प्रकल्प लवकरच पूर्ण होतील. शहराचा कचरा होऊ देणार नाही असेही पांडेय यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com