आदेश न आल्याने शिवसेनेने उपमहापौरपदासाठी भरले दोन अर्ज

आदेश न आल्याने शिवसेनेने उपमहापौरपदासाठी भरले दोन अर्ज

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी अवघ्या चार महिन्यांचा अवधी शिल्लक असताना रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी (ता.27) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. नव्या समीकरणानुसार उपमहापौरपदासाठी कॉंग्रेसला संधी द्यायची का ? यासंदर्भात वरून आदेशच प्राप्त न झाल्याने शेवटी शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ, सुरेखा सानप यांनी अर्ज दाखल केले. एमआयएम, भाजप समर्थक नगरसेवकांसह सातजणांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन पाणी पुरवठा योजनेला स्थगिती दिल्याचा आरोप करत भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, 31 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ व सुरेखा सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 

राज्यातील नव्या राजकीय समिकरणानुसार उपमहापौरपदाची मागणी कॉंग्रेसने केली आहे. यासंदर्भात वरून काय आदेश येतात, याची वाट दुपारपर्यंत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाहिली मात्र कोणतेच आदेश न आल्याने शेवटी दोघांनी अर्ज सादर केले. तर कॉंग्रेस तर्फे नगरसेवक अफसर खान यासीन खॉ, नगरसेविका शबनम बेगम कलीम कुरेशी यांनी अर्ज दाखल केला. एमआयएमचे नगरसेवक शेख जफर अख्तर यांनीही अर्ज दाखल करत मैदानात उडी घेतलीय. 

भाजपची अपक्ष नगरसेवकाला साथ 
भाजपच्या सहकार्याने अपक्ष नगरसेवक कैलास गायकवाड, गोकूळ मलके याचे अर्ज दाखल करण्यात आले. याआधी शहर विकास आघाडीचे गजनान बारवाल यांना मैदानात उतरवण्याचे भाजपने ठरवले होते. पण ऐनवेळी या निर्णयात बदल करण्यात आला. गायकवाड यांचा अर्ज भरण्यासाठी आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, डॉ. भागवत कराड, माजी महापौर भगवान घडमोडे, शिरीष बोराळकर, प्रशांत देसरडा, राजू शिंदे आदी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com