महापालिकेत महिलाराज; अडीच वर्षांसाठी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण

1995 मध्ये शिवसेनेतर्फे सुनंदा कोल्हे यांची वर्णी लागली. त्यानंतर 2004 मध्ये रुक्‍मिणी शिंदे, 2007 मध्ये भाजपच्या विजया रहाटकर, 2012 मध्ये शिवसेनेच्या कला ओझा महापौर झाल्या होत्या.
aurangabad manap
aurangabad manap

औरंगाबाद : राज्यातील 27 महापालिकांच्या पुढील अडीच वर्षाच्या महापौरपदासाठी मुंबईत आरक्षण काढण्यात आले. औरंगाबाद महापालिकेचे आरक्षण सर्वसाधारण (खुला) प्रवर्गातील महिलांसाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे महापौरपदी पुन्हा एकदा महिलेची वर्णी लागणार आहे.

औरंगाबाद महापालिकेची मार्च-एप्रिल 2020 मध्ये निवडणूक होणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. दरम्यान, महापौरपदाच्या आरक्षणाबाबतही ऑगस्ट महिन्यातच नगरविकास विभागाने माहिती मागविली होती.

राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदाचा अडीच वर्षाचा कालावधीही संपुष्टात येणार असल्याने नगरविकास विभागाने बुधवारी मंत्रालयात प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढली. त्यात औरंगाबाद महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी निघाले. सध्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या महापौरपदावर नंदकुमार घोडेले विराजमान आहेत. त्यांचा कार्यकाळ 29 एप्रिल 2020 ला संपणार आहे. त्यासोबतच महापालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळही संपणार आहे.

पाचव्यांदा महिलेला मिळणार मान

महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी यापूर्वी चारवेळेस आरक्षित झाले होते. 1995 मध्ये शिवसेनेतर्फे सुनंदा कोल्हे यांची वर्णी लागली. त्यानंतर 2004 मध्ये रुक्‍मिणी शिंदे, 2007 मध्ये भाजपच्या विजया रहाटकर, 2012 मध्ये शिवसेनेच्या कला ओझा महापौर झाल्या होत्या. आता 2020 मध्ये खुल्या प्रवर्गातून महिला महापौरपदी विराजमान होणार असून, पाचव्यांदा हा मान खुल्या प्रवर्गातील महिलेला मिळणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. प्रभाग पद्धतीने यंदा पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. प्रभाग रचना तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग तयार होणार असून, त्यामुळे उमेदवारांची निवडून येण्यासाठी आवश्‍यक मते मिळविताना दमछाक होणार आहे. 115 पैकी 57 वॉर्ड महिलांसाठी राखीव असतील.

दरम्यान, प्रभागरचना करताना भौगोलिक रचनेनुसार वॉर्ड एकमेकांना न जोडता वॉर्ड क्रमांकानुसार जोडले जात असल्यामुळे इच्छुकांसाठी ही निवडणूक आव्हानात्मक असणार आहे. असे असले तरी आरक्षण सोडत निघताच इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 
विद्यमान नगरसेवकांमध्ये 10 ते 15 महिला खुल्या प्रवर्गाच्या आहेत; मात्र यावेळी महापौरपदाची संधी न मिळाल्याने पुढील निवडणुकीत विजय मिळविण्याबरोबरच महापौरपदावरही त्यांचा डोळा असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com