पत्नीचे सभापतिपद गेल्यानंतर तातडीने पतीला परळीत अटक - police arrests Baban Gitte in Parali after his wife looses her post | Politics Marathi News - Sarkarnama

पत्नीचे सभापतिपद गेल्यानंतर तातडीने पतीला परळीत अटक

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 7 जानेवारी 2021

परळीतील राजकारणात वेगवान घडामोडी

बीड : परळीत सकाळी पत्नी उर्मिला गित्ते यांच्या विरोधात दहा विरुद्ध शून्य असा अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर सायंकाळी त्यांचे पती शशिकांत उर्फ बबन गित्ते यांना अटक करण्यात आली. जमावबंदीचे नियम तोडल्यासह इतरही काही प्रकरणात परळी पोलिसांनी अटक केली.

जनक्रांती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करणारे शशिकांत उर्फ बबन गित्ते यांनी विधानसभा निवडणुकीत परळीतून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना मदत केली होती. त्या बदल्यात वर्षभरापूर्वी त्यांच्या पत्नी उर्मिला गित्ते यांना परळी पंचायत समितीचे सभापतीपद देण्यात आले. मात्र, सभापतीपदाच्या काळात राष्ट्रवादीच्या सदस्यांसह सरपंचांना निधी वाटपात दूर ठेवून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सढळ हात सोडल्याने नाराजी वाढली होती.

अखेर सदस्यांनी उर्मिला गित्ते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करुन गुरुवारी (ता. सात) दहा विरुद्ध शुन्य असा हा ठराव संमत झाला. यामुळे बबन गित्ते यांचे समर्थक संतापले व एकत्र आले आणि त्यांनी गित्तेंच्या घराबाहेर गर्दी केली. त्यामुळे शशिकांत उर्फ बबन गित्ते यांना परळी शहर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, सुरुवातीला जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक असे सांगणाऱ्या पोलिसांनी उशिरापर्यंत अटकेच्या कारणाची अधिकृत माहिती दिली नव्हती. अटकेमुळे परळीत काही काळ तणाव निर्माण झाला.

बीडमध्ये राजकीय घडामोडी काय घडल्या? 

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अंतर्गत नाराजीनाट्य आता चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे. यातूनच परळी पंचायत समितीच्या सभापतीविरुद्ध गुरुवारी अविश्वास ठराव मंजूर झाला.

परळी पालिकेत सत्तांतर घडवून राज्यात धम्माल उडवून राजकीय बंड करणाऱ्या धनंजय मुंडे यांना त्यानंतरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अपयश आले. मात्र, त्यानंतर बाजार समिती व मागच्या वेळी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी परळी मतदार संघात एकतर्फी यश मिळविले. यावेळीही त्यांनी परळी नगर पालिका निवडणुक एकतर्फी जिंकली. त्यामुळे परळी मतदार संघातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्याच ताब्यात आहेत.

दरम्यान, अंबाजोगाई पंचायत समितीही राष्ट्रवादीच्याच ताब्यात होती. परंतु, त्यावेळी मुंदडा राष्ट्रवादीत असल्याने त्यावर मुंदडांचे लेबल होते. विधानसभा निवडणुकीवेळी मुंदडा भाजपातून राष्ट्रवादीत गेले आणि नंतर झालेल्या पंचायत समिती सभापती - उपसभापती निवडीवेळी ही पंचायत समिती पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवण्यात धनंजय मुंडे यांना यश आले. एकूणच मुंदडांच्या पक्षबदलामुळे धनंजय मुंडेंना कार्यक्षेत्र विस्ताराची संधी या निमित्ताने भेटली.

अंबाजोगाईतही खदखद..

परळी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे नऊ तर भाजपचे केवळ तीन सदस्य आहेत. वर्षभरापूर्वीच्या निवडीवेळी उर्मिला गित्ते यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली. मात्र, सभापतींच्या एककल्ली कारभारामुळे सदस्यांत नाराजी वाढायला सुरुवात झाली. निधी वाटपात असमानतेच्या तक्रारी सुरु झाल्या. वर्षभराने तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. यात फटका बसेल म्हणून अखेर सभापती उर्मिला गित्ते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करुनन गुरुवारी १० विरुद्ध एक असा अविश्वास मंजूर करण्यात आला.

तीच गत अंबाजोगाई पंचायत समितीमध्येही सुरु आहे. काँग्रेसकडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या विजयमाला जगताप सभापती आहेत. मात्र, सहा महिन्यांपासून उर्वरित ११ सदस्य त्यांच्या विचरोधात आहेत. अगदी पाच मासिक सभांना सदस्य गैरहजर राहिले, तर मागच्या सभेतही केवळ एका ठरावाला मान्यता देऊन उर्वरित सर्व ठरावांना विरोध केला गेला. परळीत सभापतीविरुद्ध अविश्वास ठरावाचे अस्त्र उगारण्यात आले. आता अंबाजोगाईत काय होणार हे पहावे लागणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख