58 मतांच्या फरकाने अनेकांचे ठोके चुकले... पण संदीप क्षीरसागर `जायंट किलर` ठरले... - beed assembly election counting had increased heart beats of political workers last year | Politics Marathi News - Sarkarnama

58 मतांच्या फरकाने अनेकांचे ठोके चुकले... पण संदीप क्षीरसागर `जायंट किलर` ठरले...

दत्ता देशमुख
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

अनेक नेते आणि तरुणांची फौज संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी होती. परंतु, राजकीय डावपेच, निवडणुकांचे अनुभव काका जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे होते. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपची लाट आणि जयदत्त क्षीरसागरांच्या पाठीशी भाजपही होती. बीडमधील गाजलेल्या निकालाची आज वर्षपूर्ती. त्यानिमित्त त्याला उजाळा. 

बीड : मातब्बर काकांना आव्हान देत नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्या लढविल्या. त्यात मोठे यशही मिळविणारे पुतणे संदीप क्षीरसागर विधानसभेला काका जयदत्त क्षीरसागर यांच्यापुढे टिकाव धरतील का, ही शंका तरुणांच्या फौजेमुळे खोटी ठरली आणि ते जायंट किलर ठरले.

मतमोजणीची सुरुवात 24 आॅक्टोबरला झाली. बीड मतदार संघातील शिरुर कासार तालुक्यांतील गावांतून. यात सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांना हजारेक मतांची आघाडी मिळाली. बीड शहराची मोजणी सुरु झाली आणि जयदत्त क्षीरसागर यांना इथेच धोक्याची घंटा भेटली. शहराच्या मत मोजणीत तर संदीप 
क्षीरसागर दहा हजारांहून अधिक मतांनी पुढे सरकले. पण, नंतर पाली, चौसाळा, नाळवंडी या ग्रामीण भागाने जयदत्त क्षीरसागरांना बऱ्यापैकी साथ दीली. त्यामुळे मतमोजणी शेवटच्या टप्प्यात येत असताना संदीप क्षीरसागरांच्या लिडचे आकडे हळुहळू कमी होत गेले. शेवटी चौसाळा सर्कल लागले आणि लिड पुन्हा कमी झाल्याने संदीप क्षीरसागर समर्थकांचा उत्साह मावळला. इकडे जयदत्त क्षीरसागर यांच्या शामियान्यातही फारसा उत्साह नव्हता. एक वेळ तर अशी आली कि दोघांच्या मतांत केवळ ५८ मतांचा फरक राहीला.

त्यामुळे दोन्हीकडेही ‘दिल कि धडकन’ वाढली होती. पण, शेवटी निकाल आणि राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागर यांनी काका व शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांचा पावणेदोन हजार मतांनी पराभव केला. तरुण संदीप क्षीरसागर जायंट किलर ठरल्याने शहरभर आणि मतदार संघात गुलालाची उधळण करुन मिरवणुका निघाल्या. संदीप क्षीरसागर यांनी निवडणुकीअगोदर तरुणांनी डोक्यावर घेतले होते तर मिरवणुकांत नेत्यांनी त्यांना खांद्यावर घेतले. 

पंचायत समिती सदस्य म्हणून राजकारणाची सुरुवात केल्यानंतर पाच वर्षे सभापती राहीलेले संदीप क्षीरसागर पुढे जिल्हा परिषदेतही शिक्षण, बांधकाम, अर्थ अशा महत्वाच्या समित्यांचे सभापती होते. परंतु, नगर पालिका निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्यावरुन ‘काका - पुतण्या’ अंक सुरु झाला आणि संदीप क्षीरसागर यांनी ‘काकू - नाना’ विकास आघाडी उभारली. दरम्यान, त्यावेळी जिल्ह्यात जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीकडून विजयी झालेले एकमेव आमदार होते. जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत असले तरी मेटे विरोधक म्हणून पंकजा मुंडे यांची त्यांना मोठी साथ होती. तसे जयदत्त क्षीरसागर हे जिल्ह्यातील मुरब्बी राजकारणी, चार वेळा आमदार आणि उपमंत्री ते कॅबीनेटमंत्री असा त्यांचा प्रवास राहीलेला. त्या काळी चालती असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अशा मंडळींकडूनही क्षीरसागरांच्या मागण्यांची तत्काळ दखल असे चित्र होते.

निवडणुकांच्या टप्प्यात तर संदीप क्षीरसागरांच्या हाती कुठली संस्थाही नव्हती. मग, पुढे काय होणार असे अनेक प्रश्न होते. पण, भाजपची भलतीच लाट आणि राष्ट्रवादीतल्या क्षीरसागर विरोधकांची संदीप क्षीरसागरांना साथ म्हणून लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी थेट भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांचा प्रचार केला. मात्र, तोलामोलाचा नेता आपल्या पक्षात कशाला, असे भाजप नेत्यांना वाटल्याने त्यांना ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करावा लागला. क्षीरसागरांनी भाषणात शरद पवारांवरही थेट टिका केली होती. त्यामुळे खुद्द पवारांनीही बीडमध्ये लक्ष घातले होते. पवारांना मानणारा मोठा वर्ग संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी उभारला. तसेच मागच्या दहा वर्षांत त्यांनी तरुणांची चांगली फळी उभा केलेली होतीच.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख