मागच्या दाराने जाणारे म्हणून धनंजय मुंडे यांना हिणवणे या निकालानंतर बंदच झाले... - backdoor entry leader criticism on dhananjay munde stopped after this result | Politics Marathi News - Sarkarnama

मागच्या दाराने जाणारे म्हणून धनंजय मुंडे यांना हिणवणे या निकालानंतर बंदच झाले...

दत्ता देशमुख
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

विरोधी पक्षनेते असताना पाच वर्षे परळी मतदार संघात केलेली बांधणी धनंजय मुंडे यांच्या कामाला आली. मतदानापूर्वी धनंजय मुंडे यांचे कथित वक्तव्य आणि पंकजा मुंडे चक्कर येऊन पडल्याचे व्हिडीओ भलतेच व्हायरल झाले. परळीतील त्या चर्चेच्या निकालाची आज वर्षपूर्ती...

बीड : धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे असताना पाच वर्षे परळी विधानसभा मतदारसंघाची बांधणी केली. सर्वच स्थानिक निवडणुकांत विजयाचा गुलाल उधळला. पण, मतदानाच्या तोंडावर भाषणातील एक कथित वक्तव्य आणि त्यानंतर पंकजा मुंडे स्टेजवर चक्कर येऊन पडल्याचे व्हायरल झालेले व्हिडीओ भलतेच व्हायरल झाले. मात्र, याचा परिणाम मतदानात झाला नाही.

मतमोजणीत सुरुवातीपासून लिड घेतलेल्या धनंजय मुंडे यांची आघाडी शेवटपर्यंत वाढतच गेली आणि त्यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा ३२ हजार मतांनी पराभव केल्याचे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानंतर परळी शहर आणि मतदार संघात धनंजय मुंडे समर्थकांचा एकच जल्लोष झाला. मागच्या दाराने जाणारे असे हिणावणाऱ्या विरोधकांना धनंजय मुंडे यांनी चांगलेच उत्तर देऊन टाकले. पक्षानेही त्यांच्या विजयाची नोंद घेतली आणि त्यांच्यावर महत्वाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी दिली. 

जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय सुरुवात करणाऱ्या धनंजय मुंडे यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, विधान परिषदेची आमदारकी अशी अनेक पदे भाजपमध्ये मिळाली. मात्र, २०१२ च्या नगर पालिका निवडणुकीत त्यांचे आणि काका दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यात दरार पडली आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यांनी मतदार संघात चांगली बांधणी केली मात्र २०१४ च्या निवडणुकीत त्यांना यश मिळविता आले नाही. मात्र, सर्वत्र भाजपची लाट आणि दिवंगत मुंडे यांच्या निधनाची सहानुभूती असतानाही पंकजा मुंडे यांचे मताधिक्क कमी करण्यात धनंजय मुंडे यशस्वी ठरले होते.

दरम्यान, त्यांच्यातील वकृत्व, नेतृत्व आणि संघटन गुणांची दखल घेत राष्ट्रवादीने विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपद दिले. त्यानंतर झालेल्या नगर पालिका, जिल्हा परिषद - पंचायत समिती व बाजार समिती निवडणुकांत एकतर्फी विजय मिळविला. मात्र, पंकजा मुंडे यांच्याकडेही त्यावेळी राज्यात ग्रामविकास हे महत्वाचे पद होते. त्यामाध्यमातून त्यांचीही विकासाची घोडदौड सुरुच होती.

विधानसभा निवडणुकीत तर सर्वत्र भाजपचीच चालती होती. अगोदर झालेल्या स्थानिक निवडणुकांतील विजयांमुळे धनंजय मुंडे यांचा आत्मविश्वास कमालीचा दुणावलेला होता. मात्र, तत्पुर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परळी मतदार संघातून भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांनाच मताधिक्क्य भेटलेले होते. त्यामुळे विधानसभेला काय होणार, असा प्रश्न होता. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सुरु होता.

दोन्ही नेते राज्यभर प्रचार करुन आपली परळी सांभाळणे अशी दुहेरी कसरत करत होते. मात्र, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात एका सभेतील धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरुन भाजपने त्यांना घेरले. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल करुन धनंजय मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. समारोपाच्या प्रचार सभेत पंकजा मुंडे चक्कर येऊन व्यासपीठावरच कोसळल्या. त्यामुळे आता काय, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. मात्र, परळीतल्या मतदारांवर याचा परिणाम झाला नाही. मतदानानंतर मोजणी सुरु झाली आणि धनंजय मुंडे सुरुवातीपासूनच लिडवर राहीले. लिड वाढत गेली आणि त्यांनी पंकजा मुंडे यांचा ३२ हजार मतांनी पराभव केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख