औरंगाबाद-जालना विधान परिषदेसाठी युतीचा उमेदवार 26 जुलैला ठरणार 

युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे अर्जून खोतकर, राजू वैद्य, नरेंद्र त्रिवेदी आणि विनोद पाटील यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून घेतली जात आहेत.
khotkar-vinod-patil
khotkar-vinod-patil

औरंगाबादः जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार कोण असेल याचा फैसला येत्या 26 जुलै रोजी होणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यासंदर्भात मुंबईत बैठक घेऊन उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जून खोतकर, औरंगाबाद पुर्वचे शिवसेना शहरप्रमुख राजू वैद्य, जिल्हाप्रमुख नरेंद्र वैद्य यांच्याशिवाय मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील यांची नावे चर्चेत आहेत. 

येत्या 19 ऑगस्ट रोजी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असला तरी युती-आघाडीचा उमेदवार कोण असेल हे अद्याप जाहीर झालेले नाही. 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत हा मतदारसंघ कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे होता. कॉंग्रेसच्या सुभाष झांबड यांनी शिवसेनेच्या किशनचंद तनवाणी यांचा पराभव केला होता. 

मतदारसंघातील एकूण 657 मतदारांचे संख्याबळ असून सर्वाधिक सदस्य हे युतीकडे आहेत. त्यामुळे युतीचा उमेदवार या मतदारसंघातून सहज विजयी होईल असे बोलले जाते. युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे अर्जून खोतकर, राजू वैद्य, नरेंद्र त्रिवेदी आणि विनोद पाटील यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून घेतली जात आहेत. यापैकी एका नावावर 26 जुलै रोजी उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून विद्यमान आमदार सुभाष झांबड, जालना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख व अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबुराव कुलकर्णी हे देखील इच्छुक आहेत.

कॉंग्रेसच्या उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी उद्या (ता.24) औरंगाबाद येथील गांधी भवन या पक्ष कार्यालयात दोन्ही जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका सदस्यांची बैठक घेण्यात येणार आहे. यातून सर्वसहमतीने जे नाव समोर येईल ते पक्षश्रेष्ठींना कळवण्यात येणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com