औरंगाबाद भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी जाणार शिवसेनेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत किशनचंद तनवाणींसह अनेकांची घरवापसी होण्याची शक्यता आहे. भाजपसाठी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का समजला जातोय
BJP Leader Kishanchand Tanwani to Enter Shivsena
BJP Leader Kishanchand Tanwani to Enter Shivsena

औरंगाबाद : एप्रिल मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध स्वबळावर लढण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला निवडणुकीआधीच ग्रहण लागले आहे. महापालिका निवडणुकीत शहराध्यक्ष म्हणून मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी आपल्या समर्थक दहा ते बारा  आजी माजी  नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तनवाणींसह अनेकांची घरवापसी होण्याची शक्यता आहे. भाजपसाठी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का समजला जातोय . विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य मधून लढण्यास इच्छुक असलेल्या तनवाणी यांना राज्यात शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी माघार घ्यायला लावली होती. तेव्हापासून तनवाणी हे भाजपमध्ये नाराज होते .

पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी शहराच्या विशेषता मध्य मतदारसंघात तनवाणी यांनी जोरदार पक्षबांधणी केली होती. याचा फायदा आगामी महापालिका निवडणुकीत करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे किमान महापालिका निवडणुका होईपर्यंत तरी शहराध्यक्षपदी मुदतवाढ मिळावी अशी इच्छा तनवाणी यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती.

शिवसेनेकडून पायघड्या

मात्र जुन्या नव्याच्या वादामुळे भाजपने कामगार मोर्चाचे अध्यक्ष संजय केनेकर यांची शहराध्यक्षपदी निवड केली. त्यानंतर प्रचंड नाराज असलेल्या तनवाणी यांनी शिवसेनेशी जवळीक वाढवत भाजपला संकेत दिले होते. गजानन बारवाल यांना मातोश्रीवर पाठवत तनवाणी यांनी शिवसेना प्रवेशाचा कानोसा घेतला .

तनवाणी शिवसेनेत येणे म्हणजे त्यांची घरवापसी असल्याचे म्हणत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून त्यांना पायघड्या घातल्या जात आहेत.  तनवाणी यांच्या घरवापसीमुळे औरंगाबाद महापालिकेतील शिवसेनेची सत्ता अबाधित राखण्यासाठी मोठा हातभार लागण्याची शक्यता आहे.

गुलमंडीवर पुन्हा भगवा

किशनचंद तनवाणी हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेतील माजी आमदार तसेच शहर प्रमुख राहिलेले आहेत. मातोश्रीशी त्यांचा थेट संपर्क असल्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशात आला कुठलीही अडचण येण्याची शक्यता नाही .शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी नुकतीच तनवाणी यांची यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती .यावरून तनवाणी यांचा शिवसेना प्रवेश निश्चित समजला जातो.

भाजपमधील एक गट कायमच तनवाणी यांच्याविरोधात राहिला .बाहेरून आलेल्यांना पक्षाकडून पदांची खिरापत वाटली जाते असा आरोप भाजपमध्ये आल्यानंतर शहराध्यक्ष पद मिळालेल्या तनवाणी यांच्यावर केला गेला. मात्र तनवाणी यांची उपद्रव शक्ती ,चाणक्य नीति आणि शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्याची त्यांची ख्याती, यामुळे भाजपमधील स्थानिक नेत्यांनी मौन धारण केले होते. 

एव्हढेच नाही तर तनवाणी यांनी भाजपमध्ये आल्यानंतर शिवसेनेला अनेक धक्के दिले होते. 2015 च्या महापालिका निवडणुकीत गुलमंडी या शिवसेनेच्या बालेकिल्यातच शिवसेनेचा पराभव केला होता. परंतु नव्याने शहराध्यक्षपद देताना मात्र तनवाणी यांच्या नावाला स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता.

तनवाणी यांना शहराध्यक्ष पदापासून रोखण्याचा मोठा फटका आता भाजपला महापालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे .त्यामुळे भाजपकडून तनवाणी यांना रोखण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले असले तरी तनवाणी यांनी मात्र शिवसेनेचे धनुष्य हाती घेण्याचा निर्धार केलेला दिसतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com