औरंगाबादच्या आगामी महापालिका निवडणुकीतही महाशिवआघाडी होईल का ?

औरंगाबादच्या आगामी महापालिका निवडणुकीतही महाशिवआघाडी होईल का ?

औरंगाबाद : मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय समीकरणे बदलणार आहेत. महापालिकेत गेल्यावेळी शिवसेनेने 28 जागांवर विजय मिळवत सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला होता; मात्र तो युतीत. आता मात्र भाजपची नव्हे, तर शहरात फारसा जनाधार नसलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सोबत शिवसेनेला घ्यावी लागणार आहे. 2015 ची निवडणूक वॉर्ड पद्धतीने झाली होती. आगामी महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार असल्यामुळे युतीचे नगरसेवक आधीच हवालदिल झाले आहेत. 

राज्यात भाजप सोडून हे तीन पक्ष एकत्र आल्याच्या पार्श्‍वभूमीवर अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत काय होणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना एकत्र आले व एमआयएमच्या धास्तीने 2015 मध्ये महापालिकेची निवडणूक युतीत लढवली होती. औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक 28 जागा जिंकत वर्चस्व मिळविले. त्यापाठोपाठ एमआयएमने 25 जागांवर विजय मिळविला. भाजप मात्र 23 जागांवरच अडकली. सोबत असलेल्या अपक्ष नगरसेवकांची वेगळी आघाडी करून भाजपने खेळी करत महापालिकेतील अनेक पदे मिळविली. सुरवातीला दीड वर्ष महापौरपद शिवसेनेला, त्यानंतर एक वर्ष भाजप व शेवटची अडीच वर्षे पुन्हा शिवसेनेला महापौरपद देण्यात आले. 

स्थायी समिती सभापतिपद पाच वर्षांपैकी तीन वर्षे भाजपकडे, तर दोन वर्षे शिवसेनेकडे ठरले होते. ठरल्याप्रमाणे पदांचे वाटपही झाले; मात्र विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ संपत आलेला असताना पुन्हा युती तुटली. एकीकडे महापालिकेच्या निवडणुकीची तयारी तर दुसरीकडे 25 वर्षे जुने मित्र भाजप व शिवसेना आगामी महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणार, असे वातावरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रभागरचनेनुसार महापालिकेची निवडणूक होणार आहे. एका प्रभागात चार वॉर्डांचा समावेश आहे. त्यामुळे उमेदवारांना सध्याच्या चार वॉर्डांमध्ये प्रचार करावा लागणार आहे. प्रभागामुळे आधीच गोंधळाचे वातावरण असताना त्यात राजकीय समीकरणे बदलणार असल्याने इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकही हवालदिल झाले आहेत. 

युतीमुळे महापालिकेत हिंदु मतांचे विभाजन टळत होते, परिणामी शहरावर युतीची पंचवीस वर्षापासून निर्विवाद सत्ता कायम राहिली. आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगळे लढले तर याचा सर्वाधिक फटका हा भाजपला बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून राज्यात सत्ता स्थापन केली आणि तोच प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थेत झाला तर भाजपची डोकेदुखी वाढू शकते. अर्थात शिवसेनेला देखील कॉंग्रेस-राष्ट्रवादीसाठी काही प्रभाग सोडावे लागतील. एकंदरित राज्यातील सत्ता समीकरणांचा परिणाम औरंगाबाद महापालिकेतही दिसण्याची शक्‍यता आहे. 

असे आहे सध्याचे पक्षीय बलाबल 
--------- 
शिवसेना-28 
भाजप-23 
एमआयएम-24 
कॉंग्रेस-12 
अपक्ष-18 
बसप-04 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com