aurangabad congress | Sarkarnama

औरंगाबादमध्ये कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष "नामधारी'च

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 मार्च 2017

औरंगाबाद ः नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर वरिष्ठांवर आगपाखड करत आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असतांना पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही असे होऊ नये म्हणून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शहराध्यक्ष असलेल्या नामदेव पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा पदभार सोपवला. परंतु चार महिन्यातील कॉंग्रेसमधील घडामोडी, गटबाजी पाहता नामदेव पवार हे प्रभारी जिल्हाध्यक्ष नव्हे तर केवळ नामधारी असल्याचे बोलले जाते. 

औरंगाबाद ः नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर वरिष्ठांवर आगपाखड करत आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असतांना पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही असे होऊ नये म्हणून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शहराध्यक्ष असलेल्या नामदेव पवार यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा पदभार सोपवला. परंतु चार महिन्यातील कॉंग्रेसमधील घडामोडी, गटबाजी पाहता नामदेव पवार हे प्रभारी जिल्हाध्यक्ष नव्हे तर केवळ नामधारी असल्याचे बोलले जाते. 

जिल्हा परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे 16 सदस्य विजयी झाले. नगरपालिकेत पाठ फिरवलेले कॉंग्रेसचे सगळेच नेते नामदेव पवारांना बळ देण्यासाठी प्रचारात उतरले होते. आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांवर तोफ डागली होती. त्यामुळे नामदेव पवारांना पॉवर देत सत्तारांचा काटा काढण्याचा त्यांचा डाव होता. पण प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा डोक्‍यावर हात असल्याने सध्या जिल्ह्यात सत्तारांचीच चलती असल्याचे सिध्द झाले आहे. 

शिवसेनेशी हात मिळवणीत सत्तारांचाच पुढाकार 
जिल्हा परिषदेत 18 सदस्य असलेल्या शिवसेनेला अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय पुर्णपणे आमदार सत्तार व त्यांच्या समर्थकांचा होता. यासाठी सत्तार यांनी अशोक चव्हाण यांच्याकडून खास परवानगी देखील मिळवली होती. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत कुठेही प्रभारी जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांचा सहभाग नव्हता. कॉंग्रेसच्या सदस्यांना सहलीवर नेणे, आणणे, त्यांना कुठे ठेवायचे, उपाध्यक्षपद कुणाला द्यायचे हे सगळे निर्णय अब्दुल सत्तार यांनीच घेतले. त्यानूसार सिल्लोड तालुक्‍यातील 8 पैकी 6 सदस्य निवडून आणणाऱ्या सत्तारांनी आपल्या मर्जी व तालुक्‍यातील अंधारी गटातून विजयी झालेल्या केशव तायडे यांना उपाध्यक्ष केले. विशेष म्हणजे या दरम्यान, नामेदव पवार यांनी काहीही न बोलणे पंसत केले. शिवाय ते सत्तार यांच्यापासून अंतर राखतांना दिसत आहेत. 
सत्तार-पवार यांच्यात "संघर्ष' 
जिल्हाध्यक्षपदी अल्पसंख्याक समाजाचा प्रतिनिधी म्हणून अब्दुल सत्तार यांची तर शहराध्यक्षपदी मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून नामदेव पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासूनच सत्तार व पवार यांच्यात खटके उडू लागले होते. सत्तार यांच्या एकाधिकारशाही विरोधात पवारांनी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी देखील केल्याचे कळते. मात्र यात सत्तार पवारांवर भारी पडले. जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रभारी पदभार नामदेव पवारांकडे आला आणि ते उत्साहाने कामाला लागले. पण हा उत्साह फारकाळ टिकला नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुका होताच सत्तारांनी पुन्हा जिल्ह्याची सुत्रे आपल्या हाती घेतल्याचे दिसते. त्यामुळे सत्तार आणि पवार हे एकमेकांकडे पाठ फिरवत असून कार्यक्रम, आंदोलन स्वतंत्रपणे घेत आहेत. दोन नेत्यांच्या सत्ता संघर्षात कार्यकर्ते मात्र भरडले जात असल्याचे चित्र आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख