aurangabad collector warns who disobeying instructions | Sarkarnama

गर्दीविषयक सूचनांना जे जुमानणार नाहीत त्यांच्यावर पोलिस बळाचा वापर!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 मार्च 2020

पुढील दहा दिवस अतिशय महत्त्वाचे असल्याने गरज असेल तर नागरिकांनी बाहेर पडावे. खरबदारीचा उपाय म्हणून आम्ही पाच ठिकाणी महापालिकेतर्फे स्क्रीनिंग करत आहोत

औरंगाबादः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुढील दहा ते पंधरा दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत, पण आवाहन करूनही काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे गर्दी कमी झालेली नाही. आता यापुढे गर्दी केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिला. आवश्‍यकता असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन करतांनाच टपऱ्या, पानटपऱ्या, बार, रेस्टॉरंट बंद करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकांमध्ये कोरोनाबाबत समज-गैरसमज आहेत. सध्या आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असला तरी नागरिकांच्या सहकार्याशिवाय या रोगाविरोधात लढा देणे शक्य होणार नाही. गर्दी नियंत्रित करण्यासाठी शासनाने शाळा, महाविद्यालये, पर्यटनस्थळे बंद केली आहेत. आता शासकीय कार्यालयांतही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. शंभर टक्के कार्यालये बंद शक्य नाही. मात्र कार्यालयप्रमुखांच्‍या आदेशाने 50 टक्के कमर्चारी आळीपाळीने काम करू शकतील. महसूलमध्ये मात्र असे राहणार नाही.

स्थानिक पातळीवर शासकीय बैठका घेण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयात येण्या-जाण्यासाठी एकच रस्ता ठेवण्याचे सांगितले आहे. तेथे सुद्धा येणाऱ्यांचे स्क्रीनिंग केले जाईल. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, समस्या प्रत्यक्ष न येता ई-मेलद्वारे पाठवाव्यात. गर्दीविषयक सूचनांना जे आता जुमानणार नाही त्यांच्यावर पोलिस बळाचा सुद्धा वापर केला जाईल असा निर्वाणीचा इशारा देतांनाच हरिनाम सप्ताह देखील बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले.

पुढील दहा दिवस अतिशय महत्त्वाचे असल्याने गरज असेल तर नागरिकांनी बाहेर पडावे. खरबदारीचा उपाय म्हणून आम्ही पाच ठिकाणी महापालिकेतर्फे स्क्रीनिंग करत आहोत. शिवाय वसतिगृहांच्या इमारती क्वारंटाइनसाठी ताब्यात घेत असल्याचे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. महापालिकेकडे अगोदरच तीस बेड आहेत, कलाग्राम येथे शंभर बेडची क्वारंटाइनसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच क्वारंटाइनसाठी महापालिका महाराष्ट्र उद्योजकता केंद्राचे होस्टेल, देवगिरी महाविद्यालयातील मुले व मुलींचे होस्टेल, एमटीडीसी येथील बिल्डिंग ताब्यात घेत आहोत. यासोबतच आम्ही गोलवाडी नाका, रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक आणि एअरपोर्ट अशा पाच ठिकाणी स्क्रीनिंगची व्यवस्था केली असल्याचेही पांडेय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख