नागरिकत्व कायद्याविरोधातील मोर्चा औरंगाबादमध्ये शांततेत ; इम्तियाज यांनी मानले आभार

राजकीय भाषण न करता मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाने दाखवलेला संयम आणि राखलेली शांतता याचे कौतुक करतांनाच त्यांनी सगळ्याचे आभार मानले. मोर्चा संपल्यानंतर पोलीस प्रशासन आणि एमआयएमने देखील सुटकेचा निश्‍वास सोडला
नागरिकत्व कायद्याविरोधातील मोर्चा औरंगाबादमध्ये शांततेत ; इम्तियाज यांनी मानले आभार

औरंगाबाद : नागरिकत्व कायद्याविरोधात मराठवाड्यात आज विविध पक्ष, संघटनांकडून मार्चे काढण्यात आले. मराठवाड्यातील बीड, परभणी आणि हिंगोली शहरात या मोर्चाला काही ठिकाणी गालबोट लागले. औरंगाबादेत मात्र हा मोर्चा शांततेत पार पडला. एमआयएमच्या पुढाकाराने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती, महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा काढण्याचा त्यांच्या प्रयत्न होता. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी मोर्चाला झाली आणि विशेष म्हणजे कुठलाही अनुचित अथवा गैरप्रकार न घडता मोर्चा शांततेत निघाला. लोकांनी दाखवलेला संयम आणि शांततामय मार्गाने नोंदवलेल्या निषेधामुळे इम्तियाज जलील यांनी मार्चेकऱ्यांचे आणि पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभारही मानले. 

लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व विरोधी विधेयक मंजुर झाल्यानंतर देशाच्या विविध भागात लोक रस्त्यावर उतरले. निदर्शने, आंदोलन करत विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांनी या कायद्याला विरोध दर्शवला. काही भागात आंदोलनाला हिंसक वळणही लागले. एमआयएमने आज 20 डिसेंबर रोजी एकाच वेळी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये नागरिकत्व विरोधी कायद्याच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन केले होते. 

औरंगाबादेत या मोर्चाची तयारी गेल्या आठवड्याभरापासून सुरू होती. खासदार इम्तियाज जलील यांनी हा मोर्चा न भुतो न भविष्यती असा व्हावा यासाठी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना कामाला लावले होते. मशिदीमधून मौलवीच्या माध्यमातून मोर्चात सहभागी होण्याविषयीचे आवाहन देखील करण्यात आले होते. महिला, तरुण, विद्यार्थी अशा सगळ्याच क्षेत्रातील नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावे यासाठी एमआयएम प्रयत्नशील होते. आज मोर्चाला जमलेली गर्दी पाहता त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून आले. 

नियोजन आणि संयमाचे यश 
औरंगाबाद सारख्या संवेदनशील शहरात एमआयएमच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार, तो ही शुक्रवारी म्हटल्यावर शहरात भितीचे वातावरण होते. हजारो लोक रस्त्यावर उतरणार म्हटल्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो याची जाणीव पोलीस प्रशासन आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना देखील होती. परंतु मोर्चा शांततेत निघेल, कुठेही गडबड होणार नाही यांची खात्री इम्तियाज जलील यांना होती. तसा विश्‍वासच त्यांनी पोलीस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देखील दिला होता. 

दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील आझाद चौकातून मोर्चाला सुरूवात झाली तेव्हा बीड, हिंगोली, परभणी शहरात मोर्चा दरम्यान, दगडफेक झाल्याच्या बातम्या येत होत्या. आझाद चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मोर्चा जसाजसा पुढे सरकत होता, तशी गर्दी देखील वाढत होती. परंतु घोषणाबाजी आणि तरुणांचा उत्साह वगळता मोर्चात कुठेही गैरप्रकार घडला नाही. साडेचार वाजेच्या सुमारास हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. चार विद्यार्थींनीना सोबत घेऊन खासदार इम्तियाज जलील यांनी विभागीय आयुक्तांना नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवणारे निवदेन दिले. 

त्यानंतर बाहेर जमलेल्या हजारोंच्या गर्दीला त्यांनी थोडक्‍यात मार्गदर्शन केले. राजकीय भाषण न करता मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाने दाखवलेला संयम आणि राखलेली शांतता याचे कौतुक करतांनाच त्यांनी सगळ्याचे आभार मानले. मोर्चा संपल्यानंतर पोलीस प्रशासन आणि एमआयएमने देखील सुटकेचा निश्‍वास सोडला. एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन देखील मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार किंवा गोंधळ उडाला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी निघालेल्या शिस्तबध्द आणि संयमी मोर्चाची आठवण या निमित्ताने झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com