Aurangabad :BJP focusing on four leaders | Sarkarnama

औरंगाबादच्या खासदारकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी 

सरकारनामा न्यूज ब्युरो 
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

पुणे  : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपतर्फे सध्याच्या परिस्थितीत हरिभाऊ बागडे, विजया रहाटकर, डॉ. भागवत कराड आणि किशनचंद तनवाणी ही चार नावे चर्चेत आहेत. 

महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर आगामी निवडणुकांत युती झाली नाही तर भाजपतर्फे स्वबळाची तयारी सुरू झाली आहे. शिवसेनेबरोबर लोकसभा निवडणुकीत युती होणारच नाही असे गृहीत धरून कामाला लागण्याचे निर्देश भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळाल्याने या हालचाली सुरू झाल्या आहेत असे समजते. 

पुणे  : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपतर्फे सध्याच्या परिस्थितीत हरिभाऊ बागडे, विजया रहाटकर, डॉ. भागवत कराड आणि किशनचंद तनवाणी ही चार नावे चर्चेत आहेत. 

महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर आगामी निवडणुकांत युती झाली नाही तर भाजपतर्फे स्वबळाची तयारी सुरू झाली आहे. शिवसेनेबरोबर लोकसभा निवडणुकीत युती होणारच नाही असे गृहीत धरून कामाला लागण्याचे निर्देश भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळाल्याने या हालचाली सुरू झाल्या आहेत असे समजते. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व 1989 पासून राहिलेले आहे. 1996 मध्ये कॉंग्रेसतर्फे रामकृष्णबाबा पाटील विजयी झाले होते. हा अपवाद वगळता सातत्याने शिवसेनेने या मतदारसंघावर आपली पकड ठेवलेली आहे. 1989 आणि 1991 मध्ये मोरेश्‍वर सावे शिवसेनेतर्फे निवडून आले होते. त्यानंतर प्रदीप जैस्वाल यांनी शिवसेनेतर्फे खासदारपद भूषविले. 1999, 2004, 2009 आणि 2014 अशा लागोपाठ चारवेळा झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे चंद्रकांत खैरे निवडून आलेले आहेत. शिवसेनेचे या लोकसभा मतदारसंघात संघटन चांगले असून शाखा विस्तारही मोठा आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपला औरंगाबाद मतदारसंघ आव्हानात्मक राहण्याची चिन्हे आहेत. 
भाजपतर्फे ज्या चार नावांबाबत चाचपणी सुरू आहे त्यामध्ये हरिभाऊ बागडे यांचे नाव आघाडीवर आहे. हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. जनसंघाच्या दिवसापासून ते सक्रिय आहेत . जिल्ह्यात भज वाढविण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे . ते फुलंब्री मतदारसंघाचे आमदार आहेत. औरंगाबाद शहरालगतच्या ग्रामीण मतदारसंघाचे त्यांनी चार वेळा आमदारपद भूषविलेले आहे. 1995 ते 99 या काळात त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणूनही काम पाहिलेले आहे. 

विजया रहाटकर या राज्य महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्षा आहेत. भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. औरंगाबाद शहराचे महापौरपद देखील त्यांनी भूषविलेले आहे. राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर त्यांचे पक्षात वजन आहे. 

डॉ. भागवत कराड हे भाजप चे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूकही लढविलेली आहे. डॉ. कराड यांनी शहराचे महापौरपदही भूषविलेले आहे. कै. गोपीनाथ मुंडे यांचे डॉ. कराड हे निकटवर्तीय राहिलेले आहेत. 

किशनचंद तनवाणी हे भाजपचे शहराध्यक्ष आहेत. शिवसेनेत असताना त्यांनी शहराचे महापौरपद मिळविले होते. त्यानंतर औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातून ते निवडून आले होते. भाजपमध्ये तीन-साडेतीन वर्षापूर्वी त्यांनी प्रवेश केला आहे. 

या चौघांपैकी कोणीही अद्याप लोकसभेसाठी औरंगाबाद मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाकडे प्रयत्न केलेले नाहीत. मात्र पक्षातर्फे हे चौघे प्रबळ आणि शिवसेनेला टक्कर देऊ शकणारे उमेदवार मानले जात आहेत. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या अन्य नेत्यांनी या चौघांपैकी एकाला पक्षाने संधी द्यावी, यासाठी मोर्चेबांधणी चालवली असल्याची चर्चा आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख