तीन हजार कोटींचा निधी देणाऱ्या सरकारच्या अभिनंदनासाठी महापालिका दोनशे होर्डिंग लावणार

तीन हजार कोटींचा निधी देणाऱ्या सरकारच्या अभिनंदनासाठी महापालिका दोनशे होर्डिंग लावणार

औरंगाबाद : राज्यात व केंद्रात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यापासून महापालिकेला रस्ते, स्मार्ट सिटीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. पाणीपुरवठा योजना मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. ही योजना मंजूर झाल्यास गेल्या पाच वर्षांत महापालिकेला मिळालेल्या निधीचा आकडा तीन हजार कोटींवर जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सरकारचे अभिनंदन महापालिका शहरात दोनशे होर्डींग लावून करणार आहे. 

राज्य शासनाने साडेचार वर्षांत महापालिकेला रस्ते कामांसाठी चोवीस कोटी, शंभर कोटींचा निधी दिला. त्यानंतर 125 कोटींच्या निधीची घोषणा केली. तसेच केंद्र शासन स्मार्ट सिटी योजनेतून पाच वर्षांत एक हजार कोटी रुपये देणार आहे. दरम्यान पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्‍वासन देत मुख्यमंत्र्यांनी 1 हजार 694 कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. 

युती सरकारच्या काळात औरंगाबाद शहराला भरभरून निधी मिळाल्याबद्दल महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करून शहराच्या विविध भागात त्यांच्या अभिनंदनाचे सुमारे 200 होर्डिंग्ज तीन महिन्यांकरिता लावावे, अशा मागणीचा प्रस्ताव भाजप नगरसेवक राजू शिंदे यांनी सर्वसाधारण सभेत ठेवला होता. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. या होर्डिंग्जमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही फोटो लावावे, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी केली. 

विरोधी पक्षाचे गटनेते नासेर सिद्दीकी यांनी होर्डींगमुळे शहराचे विद्रुपीकरण होईल, असा आक्षेप घेतला. त्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी जे नियमित आहेत, तिथेच होर्डिंग लावले जातील, असे स्पष्ट करत प्रस्ताव मंजूर केला. 

आचारसंहितेची घेणार माहिती 
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यामुळे होर्डिंग लावता येतील का? असा प्रश्‍न केला असता, माहिती घेऊनच होर्डिंग लावू, असे महापौरांनी सांगितले. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असून, या पार्श्वभूमीवर युतीची जाहिरातबाजी करण्यासाठी तीन महिने अभिनंदनाचे होर्डिंग्ज शहरात झळकविण्याचा महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com