सव्वा चार लाख रुपयांची लाच : महिला उपजिल्हाधिकाऱ्यासह तिघांना अटक - acb nabs three including deputy collector for accepting Rs 4.5 lakh bribe | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

सव्वा चार लाख रुपयांची लाच : महिला उपजिल्हाधिकाऱ्यासह तिघांना अटक

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

सरकारी कामासाठीही लाच मागण्याचा प्रकार 

परभणी ः गंगाखेड नगरपालिकेतील विकासकामासाठी लागणाऱ्या निधीच्या प्रशासकीय मान्यतेसाठी चार लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह अभियंता, अव्वल कारकुनास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. आठ) ताब्यात घेतले.

गंगाखेड नगरपालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरप्रशासन विभागात विकासकामाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्याला मंजुरीसाठी एक नगरसेवक निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्याकडे पाठपुरावा करीत होता. या प्रस्तावाच्या एकूण रकमेच्या दीड टक्क्याप्रमाणे चार लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी श्रीमती सूर्यवंशी यांनी अन्य दोघा कर्मचाऱ्यांच्यामार्फत केली होती. तशी तक्रार संबंधित नगरसेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली.

विभागाच्या पथकाने सोमवारी (ता.सात) तक्रारीची पडताळणी केली. नगरप्रशासन विभागातील अव्वल कारकून श्रीकांत विलासराव करभाजने व गंगाखेड पालिकेचे स्थापत्य अभियंता अब्दुल हकीम अब्दुल खयुम यांनी चार लाख ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे व ती उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या संमतीवरूनच केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने आज सापळा रचला. त्यावेळी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून अव्वल कारकून करभाजने व अभियंता अब्दुल खयुम हे साडेचार लाख रुपये स्वीकारताना जाळ्यात अडकले. पथकाने या दोघांसह श्रीमती सूर्यवंशी यांनाही ताब्यात घेतले. नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांना साडेचार लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटक झाली आहे. त्यांच्या मालमत्तेची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी दोन पथके सज्ज केली आहेत.
- भरत हुंबे, पोलिस उपाधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परभणी.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख