aurangabad | Sarkarnama

कर्जमाफी, पंचांग आणि विरोधकांचा "संघर्ष'

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 एप्रिल 2017

औरंगाबाद ः शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वरुन कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप शनिवारी (ता.1) औरंगाबादेत झाला. एकीकडे संघर्ष यात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेस-राष्ट्रवादी भर उन्हात सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे, तर दुसरीकडे 19 पैकी 9 आमदारांचे निलंबन मागे घेत भाजप सरकारने या यात्रेतच संघर्षाची ठिणगी टाकण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यातून निघालेल्या संघर्ष यात्रेच्या समारोप प्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण चांगलेच गाजले. "शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पंचांग पाहून मुहूर्त शोधणार का? असा टोला लगावतानाच "जमत नसेल तर खुर्ची रिकामी करा, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ' असे आव्हान देखील यावेळी त्यांनी दिले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अनुपस्थितीमुळे दोन्ही कॉंग्रेसमध्ये काही "संघर्ष' तर नाही ना? अशी शंका देखील उपस्थित केली गेली. एकूणच विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केलेला संघर्ष फळाला येतो का? हे लवकरच स्पष्ट होईल. 

जालन्याहून निघालेली संघर्ष यात्रा दुपारी औरंगाबादेत पोहचली ती थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या आमदार सत्तार व इतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडे. तिथे त्यांचे उपोषण संपवल्यावर सगळे नेते आमखास मैदानावर दाखल झाले. इथे जमलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या समक्ष पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. "कर्जमाफी देण्यासाठी आणखी किती आत्महत्यांची वाट पाहणार, योग्य वेळ म्हणजे निवडणुका आल्यावर कर्जमाफी देणार का? हे सरकार गांडुळाची औलाद आहेत अशा शब्दांत या सरकारचा समाचार नेत्यांनी घेतला. घाटशेंद्रा येथील शेतकऱ्याला मंत्रालयात झालेल्या मारहाणीचा उल्लेख करतानाच "एका शेतकऱ्याला हात लावला तर सगळ्या शेतकऱ्यांनी पेटून उठलं पाहिजे' असे आव्हाने देखील या सभेत नेत्यांकडून करण्यात आले. तूर खरेदी बंद, बारदानाची न झालेली खरेदी यासह शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारणाऱ्या सरकारवर 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून पळून गेलेल्या विजय मल्ल्या याला भाजपनेच खासदारकी दिल्याचा आरोप करण्यात आला. 
बाबा-दादांचे सूर जुळले 
संघर्ष यात्रेमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का नाही? हे सांगता येत नसले तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूर या निमित्ताने जुळल्याचे चित्र आहे. अगदी चंद्रपूर ते नागपूर दरम्यानच्या बस प्रवासात हे दोन नेते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना हायसे वाटले होते. एरवी एकमेकांचे तोंडही न पाहणारे हे पश्‍चिम महाराष्ट्रातील वजनदार नेते संघर्ष यात्रेच्या निमित्ताने वारंवार समोर समोर आले. औरंगाबादेतील जाहीर सभेत दोघांनी केलेल्या भाषणात देखील बरेच साम्य होते. त्यामुळे बाबा-दादांमधील संघर्षाला पुढील काळात विराम मिळेल अशी आशा दोन्ही पक्षातील कार्यकर्ते बाळगू आहेत. 
कॉंग्रेसचे शक्ती प्रदर्शन 
औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसमध्ये प्रभारी जिल्हाध्यक्ष नामदेव पवार विरुद्ध माजी जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार असा संघर्ष पहायला मिळतो. सत्तार यांना नामदेव पवारांचे नेतृत्व मान्य नसल्याने संघर्ष यात्रेची सगळी सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतल्याचे दिसून आले. यात्रा सर्व पक्षीय विरोधकांनी मिळून काढली असली तरी कॉंग्रेसने हा कार्यक्रम हायजॅक केल्याचे चित्र होते. यात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या डोक्‍यावर कॉंग्रेसची टोपी आणि गळ्यात उपरणे होते. या उलट एसी बसमधून प्रवास केल्यामुळे होणारी टीका पाहता राष्ट्रवादीने संघर्ष यात्रेत कुठल्याच प्रकारची जाहिरातबाजी किंवा चमकोगिरी केली नाही. कॉंग्रेसने मात्र संघर्ष यात्रेनिमित्त मिळालेली शक्तीप्रदर्शनाची संधी कॅश केल्याचे बोलले जाते. संघर्ष यात्रेला एमआयएमने पाठिंबा जाहीर केला होता, मात्र यात्रा आणि जाहीर सभेत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी पाठ फिरवल्यामुले उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. 
शेतकऱ्यांच्या मुलांसोबत नेत्यांचे भोजन 
संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थांसोबत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जेवण केले. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. अजित पवार यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधतांना "तुम्हाला कसलीच कमी पडू देणार नाही, काहीही गरज पडली तर थेट मला फोन करा, तुमच्या मदतीला धावून येईन' असा वादा या मुलांशी केला. यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने या संस्थेला अडीच लाखांची थैली मदत म्हणून देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकी दरम्यान, उस्मानाबाद येथे कार्यकर्त्यांच्या घरी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सोन्याच्या ताटामध्ये जेवण केल्याची टीका करण्यात आली होती. त्यानंतर स्पष्टीकरण देता देता कॉंग्रेस नेत्यांच्या नाकीनऊ आले होते. त्यामुळे यावेळी जमिनीवर बसूनच नेत्यांनी मुलांसोबत जेवण केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख