औरंगाबाद महापालिकेत आता भाजप नगरसेवकांची स्वतंत्र चूल

औरंगाबाद महापालिकेत आता भाजप नगरसेवकांची स्वतंत्र चूल

औरंगाबाद : राज्यातील शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचे पडसाद मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले. "एनडीए' तून बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी संसदेत विरोधी बाकावर बसणे पसंत केले. औरंगाबाद महापालिकेत भाजपने देखील तोच कित्ता गिरवत शिवसेनेसोबत न बसता स्वतंत्र चूल मांडल्याचे चित्र दिसले. एवढ्यावरच न थांबता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जय पराजयावरून देखील सेना-भाजपच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. 

महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आयुक्तांविना पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आला. त्यावर भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी कुणी काम न करताच निवडून आले, कुणी कर्तृत्वावर निवडून आले असे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला. त्याला शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी "कुणी कशामुळे निवडून आले यावर चर्चा करण्याची ही जागा नाही, निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन झाले पाहिजे अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. 

शिंदे- जंजाळ यांच्या या कलगितुऱ्यात एमआयएमचे फेरोज खान यांनी उडी घेत " शहर खड्ड्यांत गेले आहे, लोक डेंग्यूने मरतायेत, मग काय म्हणून आमदारांचे अभिनंदन करायचे, असे म्हणत डिवचले. त्यालाही जंजाळ यांनी "परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तेव्हा तुमचे खासदार कुठे होते ? खासदार हरवले आहेत, अशी बातमी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर फिरत होती. तुमच्या खासदारांनाही जरा इकडे लक्ष द्यायला सांगा' अशा शब्दांत एमआयएमला चिमटा काढला. 


बागडे, सावे, बंब यांच्या मतदारसंघातच विकास 
पश्‍चिम मतदारसंघातून भाजपचे बंडखोर नगरसेवक राजू शिंदे यांनी शिवसेना उमेदवाराला आव्हान दिले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. ही सल मनात असलेल्या शिंदे यांनी सभेत शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, पश्‍चिम मधील सातारा-देवळाईसह विविध भागात मागील दहा वर्षांपासून प्रश्न तसेच पडून आहेत. विकास काय असतो ते हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, अतुल सावे यांच्या मतदारसंघात जाऊन बघा. शिवसेनेचा विजय हा कर्तृत्वामुळे नाही तर त्या मतदारसंघातील कर्तृत्ववान कार्यकर्त्यांमुळे आणि युतीमुळे झाला आहे. विकास म्हणता तर मग शिवसेना नेते चंद्रकांत खैरे का पडले, असा सवाल करत त्यांनी शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले. 

विधानपरिषद निवडणुकीत एमआयएमने शिवसेनेला मतदान केल्यावरून राजू शिंदे यांनी एमआयएचेही अभिनंदन करा असे म्हणत शिवसेनेला टोला लगवाला. दरम्यान राज्याच्या राजकारणात शिवसेना-भाजपमध्ये बिघडलेल्या संबंधाचे पडसाद आज सर्वसाधारण सभेतही उमटले. एरवी सभागृहात शिवसेनेसोबत बसणाऱ्या भाजप नगरसेवकांनी स्वंतत्र चूल मांडल्याचे चित्र दिसले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com