बिबट्याला जेरबंद करणाऱ्या वन विभागाचे अतुल सावेंनी केले कौतुक

बिबट्याला जेरबंद करणाऱ्या वन विभागाचे अतुल सावेंनी केले कौतुक

औरंगाबाद : शहरातील सिडको, एन- वन भागात सकाळी मॉर्निग वॉकला गेलेल्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. शहरातील उच्चभ्रू आणि नागरी वस्तीत बिबट्या घुसल्याचे कळताच सगळ्यांच्याच काळजाचा थरकाप उडाला. पण सहा तासांच्या परिश्रमानंतर वन विभागाच्या पथकाने कुणालाही इजा न होऊ देता बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. वन विभागाच्या या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी भाजप आमदार अतुल सावे स्वतः घटनास्थळी हजर होते. 

सिडको एन-1, भागातील काळा गणपती मंदिरामागच्या गॉर्डनमध्ये आज पहाटे बिबट्या दिसला. नियमित फिरायला येणाऱ्या नागरिकांपैकी एकाने बिबट्याला पाहिले आणि त्यांनी वन विभागाला माहिती दिली. बिबट्या शहरात शिरल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि बघ्यांचे लोंढे या भागाकडे वळले. दाट झाडीमुळे बिबट्या कुठे लपून बसलाय हे समजत नव्हते. सकाळी साडेआठ वाजेपासून बिबट्याची शोध मोहिम वन विभागाने हाती घेतली होती. एन-1 चा भाग भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या पूर्व मतदारसंघात येत असल्याने ते स्वतः दुपारपासून घटनास्थळी ठाण मांडून होते. या शिवाय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व प्रशासनातील अधिकारी, देखील बिबट्याचा शोध घेण्यात वन विभागाच्या पथकाला मदत करत होते. 

पथकाने नेम साधला.. 
दुपारी दोनच्या सुमारास एक बंद असलेल्या खोलीत बिबट्या दडून बसल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्यानंतर या घराला चोहोबाजूंनी जाळी लावून घरावरील सिमेंट पत्र्याला छिद्र करण्यात आले. त्यातून वन विभागाच्या अधिकाऱ्याने बिबट्याला बेशुध्द होण्याचे इंजेक्‍शन बंदुकीतून झाडले आणि काही वेळातच सहा तासांपासून धुमाकूळ घालणार बिबट्या निपचित पडला. बिबट्या जेरबंद झाल्याचे कळताच शहरवासियांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. 
आमदार पोहचले कौतुक करायला... 
वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सकाळ पासून अथक प्रयत्न केले. बिबट्याल कुठल्याही प्रकारची किंवा त्यांच्याकडून इतर कुणाला इजा न होऊ देता जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वन विभागासमोर होते. अखेर अनेक तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना यश आले. वन विभागाच्या या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी आमदार अतुल सावे देखील घटनास्थळी आले होते. सावे म्हणाले, सुदैवाने कोणतीही हानी न होता वेळेतच वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केले. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. नामशेष होत असलेली वने आणि जंगले यामुळे वन्य प्राणी गावांमध्ये मध्ये आणि शहरांमध्ये येऊ लागले आहेत. पर्यावरणातील मानवाच्या अति हस्तक्षेपाचा हा एक भीषण परिणाम आहे. जंगलांच्या वाढीसाठी आणि बचावासाठी आता कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे सांगतांनाच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जंगल भागात अधिक खाद्य आणि वृक्षलागवडीसाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे सावे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com