atul bange criticize nilesh rane | Sarkarnama

निलेश राणे विरोधात असते तर मजा आली असती! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

स्वतः पक्ष काढून एक वर्षात विसर्जित करण्याची वेळ त्यांच्यावर आली

कुडाळ (सिंधुदुर्ग): कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी आम्हाला आमदार वैभव नाईक यांच्यासमोर माजी खासदार निलेश राणे हेच उमेदवार पाहिजे होते. जेणेकरून त्यांच्या दोनदा खासदारकीच्या पराभवानंतर आता आमदारकीचा सुद्धा मोठ्या मताधिक्‍याने मतदारांनी पराभव केला असता, असा टोला माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी लगावला.

'श्री. नाईक यांना पुन्हा निवडून दिले हे मतदारांचे दुर्दैव. कमळ निशानी असती तर त्यांचा 25 हजार मताधिक्‍यांनी पराभव झाला असता', अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली होती. या वक्तव्यावर उत्तर देण्यासाठी श्री. बंगे यांनी आज शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, संजय भोगटे, संतोष शिरसाठ, नगरसेवक सचिन काळप, महेंद्र वेंगुर्लेकर, बबन बोभाटे, राजू गवंडे, सतीश कुडाळकर, गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते. 

श्री बंगे म्हणाले, " आमदार नाईक यांच्यासमोर निलेश राणे पाहिजे होते. या निवडणुकीत निश्‍चितच आमदार नाईक 25 हजाराच्या मताधिक्‍याने विजयी झाले असते. खासदार विनायक राऊत यांनी खासदार म्हणून या मतदारसंघात चांगले काम केले म्हणून दुसऱ्यांदा त्यांना मतदारांनी संधी दिली तीच किमया आमदार वैभव नाईक यांनी केली. 2014च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव करून विजयी झाले आणि यावर्षी मतदारांनी 15 हजार मताधिक्‍याने विजयी केले आहे. हे सर्व शिवसैनिक मतदारांचे श्रेय आहे. ते जनसंपर्क आणि विकासकामांच्या जोरावर निवडून आलेले सर्वसामान्यांचे आमदार आहेत. त्यामुळे ते सुदैवी आहेत, दुर्दैवी नाहीत.''  

बंगे म्हणाले, स्वतः पक्ष काढून एक वर्षात विसर्जित करण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांनी आता शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न मुळीच करू नये तसेच कमळ निशाणी असती तर 25 हजाराने वैभव नाईक याचा पराभव झाला असे म्हणणारी मंडळी स्वतःच उभी राहिली नाहीत. राहिली असती तर अधिक मजा असती. आमदार नाईक यांनी केलेल्या कामामुळे मिळालेली मते ही मतदार आणि शिवसैनिकांच्या प्रामाणिकतेचे फळ आहे. समोरचा उमेदवार नगण्य असल्याचा समज झाल्याने त्यांच्या मतांमध्ये वाढ झाली आहे हे नाकारता येत नाही.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख