athawale snubs ambedakar | Sarkarnama

आंबेडकरांनी दिल्लीचा नेता व्हावे; मी गल्लीतच बरा : आठवलेंची बोचरी टीका

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 17 डिसेंबर 2018

सोलापूर : भीमा कोरेगावच्या घटनेनंतर झालेल्या `महाराष्ट्र बंद`मध्ये माझेही कार्यकर्ते होते. प्रकाश आंबेडकर यांना या महाराष्ट्र बंदचे क्रेडिट घेऊन दिल्लीचा नेता व्हायचे आहे. त्यांनी खुशाल दिल्लीचा नेता व्हावं मी आपला गल्ली बोळाचाच नेता बरा, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

सोलापूर : भीमा कोरेगावच्या घटनेनंतर झालेल्या `महाराष्ट्र बंद`मध्ये माझेही कार्यकर्ते होते. प्रकाश आंबेडकर यांना या महाराष्ट्र बंदचे क्रेडिट घेऊन दिल्लीचा नेता व्हायचे आहे. त्यांनी खुशाल दिल्लीचा नेता व्हावं मी आपला गल्ली बोळाचाच नेता बरा, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

 
सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. एमआयएम आणि भारीपने स्थापन केलेली वंचित आघाडी वंचितांना पुन्हा एकदा सत्तेपासून वंचित ठेवणार आहे. कॉंग्रेसला मिळणारी दलित व मुस्लिमांची मतं वंचित आघाडीला मिळणार असल्याने या मतांमध्ये फूट पडेल आता त्याचा फायदा भाजपला व आमच्या रिपाइंला होईल असा अंदाजही आठवले यांनी व्यक्त केला.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रिपाइंच्यावतीने महाराष्ट्रातील दोन ते तीन जागांची मागणी केली जाणार आहे. दक्षिण मुंबई, सोलापूर, रामटेक, सातारा, लातूर यापैकी दोन जागांची आम्ही मागणी करणार आहोत. दक्षिण मुंबईमधून आपण स्वत: 2019 ची लोकसभा लढणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले. 

अधिवेशनानंतर मी देखील जाणार अयोध्येत 
शिवसेनेने जरी पहिले मंदिर फिर सरकारची घोषणा दिली असली तरीही न्यायालयाने सुनावणीसाठी दिलेली तारीख पाहता पहिले सरकार फिर मंदिर या दृष्टीने काम करणे आवश्‍यक असल्याचे आठवले यांनी सांगितले. संसदेच्या अधिवेशनानंतर आपण देखील अयोध्येचा दौरा करणार असून तेथील बौद्ध, मुस्लिम आणि हिदुंशी चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. 

संविधानासाठी आम्ही खंबीर 

कॉंग्रेस व राष्ट्रवादी राज्यात ठिकठिकाणी संविधान बचाव रॅली काढत आहेत. संविधानाला वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मी स्वत: खंबीर आहोत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीने पक्ष बचाव मोहीम राबवावी असा टोलाही आठवलेंनी लगावला. सत्तेतील वाटा अजूनही शिल्लक आहे. महामंडळाचे अध्यक्ष व राज्यातील एक मंत्रिपद आम्हाला मिळणार आहे. भाजपची यादी तयार होत नसल्याने ही प्रक्रिया थांबली आहे. आमची यादी मात्र तयार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख