दबंग - सिंघम विशेषणांचे अर्थ जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी कृतीतून दाखविले

भारतीय प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी अस्तिक कुमार पांडेय सशस्त्र सिमा सुरक्षा दलात ॲसीस्टंट कमांडंट ऑफ पोलिस पदावर कार्यरत होते. त्यामुळे शत्रुवर हल्ला कधी, कुठे आणि कसा करायचा याची त्यांना चांगलीच माहिती आहे. त्यातच पोलिस अधिकारी पुत्र असल्याने त्यांन शिस्त, वेळेचे महत्व आणि परिस्थिती हाताळण्याचे बाळकडू घरातूनच मिळालेले आहे.
दबंग - सिंघम विशेषणांचे अर्थ जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी कृतीतून दाखविले

बीड : पुर्वी एखाद्या अधिकाऱ्याबद्दल खमक्या हे विशेषण वापरले जाई. आता या शब्दाची जागा दबंग, सिंघम या शब्दांनी घेतली आहे. मात्र, या शब्दाला शोभेल अशी कामगिरी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी केली आहे. या शब्दांचे अर्थही त्यांनी कामातूनच दाखविले आहेत. आठ दिवसांत त्यांनी एका उपविभागीय अधिकाऱ्याला कार्यमुक्त केले असून दोन तहसिलदारांच्या निलंबनाचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविले आहेत. 

लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली. राजकीय आणि सामाजिक संवेदनशिल जिल्ह्यातील निवडणुका आणि त्यातच दुष्काळाने टंचाईची होरपळ अशी दुहेरी आव्हानांवर मात करण्याचे मात करण्याचे दिव्य त्यांना पेलायचे होते. राजकीय मंडळी तशी निवडणुकांच्या तयारीत दंग असतानाही त्यांनी एकाच वेळी दुष्काळी उपाय योजनांच्या नियोजनात प्रशासनाला जुंपले. याच काळात चारा छावण्या सुरु करण्याचाही निर्णय झाला. चारा छावण्यांचच्या मंजूरीत दुजाभाव केल्याचे आरोप होणार नाहीत याचीही काळजी त्यांनी घेतली. चारा छावण्या सुरु होताच निवडणुक जाहीर झाली. जिल्हा राजकीय आणि सामाजिक संवेदनशिल असल्याने शांततेत निवडणुका पार पाडण्याचे आव्हान होते. पण, महसूल - ग्रामविकास आणि पोलिस प्रशासाची सांगड घालत आणि विनातंटा निवडणुक पार पडली. 

विशेष म्हणजे राज्यात सर्वाधिक उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर तीन ईव्हीएम मशिन वापराव्या लागल्याने प्रशासनाचे काम आणि तान सहाजिकच वाढलेला होता. तरीही हे दिव्य समन्वयातून यशस्वी पार पडले होते. निवडणुका पार पडताच पुन्हा गडद झालेल्या दुष्काळावर उपाय योजनांचे नियोजन करण्याबरोबरच आणि चारा छावण्या आणि टँकर मधील अनागोंदीवर नियंत्रण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. कारण, दुष्काळात चारा छावण्या आणि टँकरच्या माध्यमातून दुष्काळाचा सुकाळ करुन लोणी खाण्याचा प्रकार सर्रास असतो. अशा मंडळींना रोखायचेही तसे अवघड असते. कारण, या लोण्याच्या गोळ्याचा घास साखळीला पोचत असल्याने या मंडळींना पाठीशी घातले जाते. 

मात्र, खुद्द जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांना घेऊन उन्हातान्हात चारा छावण्यांवर पोचले. त्यांच्या हा प्रकार लक्षात येताच बड्या अधिकाऱ्यांचे पथक स्थापन करुन छावण्यांच्या तपासण्या केल्या. परिणाममी कागदांवरील जनावरांच्या बोगस नोंदी उघड झाल्या आणि शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे छावणीसम्राटांचे स्वप्न धुळीस मिळाले आणि शासनाचे कोट्यावधी रुपये वाचले. टँकरमाफीयांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातच कंट्रोल रुम केल्याने बोगस खेपांवर चाप बसला. 

त्यानंतर जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी आपला मोर्चा अवैध वाळू उपशाकडे वळविला. जिल्ह्यात वाळू घाटांचे लिलाव नसताना बोगस वाळू उपसा होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण, वाळू माफियांसोबत महसूल आणि पोलिस विभागातील काही अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने हा प्रकार सर्रास सुरु होता. एकेविशी त्यांनी गेवराई तालुक्यातील राजापूर येथे स्वत: छापा टाकून हजारो ब्रास अवैध वाळूसाठा जप्त केला. जिल्ह्यात वाळूमाफीया, टँकर चालक आणि छावणीचालकांशी लागेबांधे असल्याने या मंडळींना पाठीशी घालण्यात प्रशासनातील काही महाभागांचा सहभाग समोर आला. त्यामुळे माफियांबरोबरच अशा महाभागांनाही शिक्षा झाली तरच प्रशासनात वचक बसेल हे पांडेय चांगलेच जाणून आहेत. 

त्यामुळे त्यांनी या प्रकरणात दोन तलाठ्यांचे निलंबन करुन उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांना एकतर्फी कार्यमुक्त केले. यामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडालेली असतानाच बीडचे तहसिलदार अविनाश शिंगटे व पाटोदाच्या तहसिलदार रुपा चित्रक यांच्या निलंबनाचे प्रस्ताव त्यांनी विभागीय आयुक्तांना पाठविले आहेत. कारवाई माफीयांवरच नाही तर त्यांना पाठीशी घालणारेही कारवाईतून सुटू शकत नाहीत हे त्यांनी यातून दाखवून दिले. खमक्या, दबंग आणि सिंघम या विशेषणांचे अर्थ त्यांनी कृतीतूनच दाखविले आहेत. 

शिस्तीचे बाळकडू तर घरातूनच
वडिल पोलिस अधिकारी असल्याने वेळ कशी पाळायची, काळ प्रतिकुल असताना त्यावर मात कशी करायची याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालेले आहे. त्यात स्वत: अस्तिक कुमार पांडेय देखील भारतीय प्रशासन सेवेत येण्यापूर्वी शसस्त्र सिमा दलात ॲसिस्टंट कमांडंट आं पोलिस होते. त्यामुळे मोठ्या रायफली आणि बंदूक कशी, कोठे आणि कोणावर चालवायची याचा अनुभव असल्याने प्रशासनात पेन चालविण्याची कसबही त्यांनी वापरली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com