अखेर महापालिकेला आयुक्त मिळाले; अस्तीक कुमार पांडे यांची नियुक्ती - Astikkumar Pande is new commission of aurangabad corporation | Politics Marathi News - Sarkarnama

अखेर महापालिकेला आयुक्त मिळाले; अस्तीक कुमार पांडे यांची नियुक्ती

जगदीश पानसरे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

बीडचे जिल्हाधिकारी अस्तीक कुमार पांडे यांची महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

औरंगाबादः गेल्या दीड महिन्यापासून औरंगाबाद महापालिकेचा कारभार महापालिका आयुक्तांशिवाय सुरू होता. सत्ताधारी पक्षाने राज्यपालांपासून आताचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे देखील पुर्णवेळ आयुक्त मिळावा अशी मागणी केली होती.

अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून बीडचे जिल्हाधिकारी अस्तीक कुमार पांडे यांची महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या संदर्भाती आदेश आज (ता.4) जारी केले.

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्‍त डॉ. निपूण विनायक हे दिवाळीसाठी प्रदीर्घ रजेवर गेले होते. रजा संपल्यानंतरही ते रूजू झाले नाही, व त्यांनी पुन्हा रजा वाढवून घेतल्यामुळे ते पुन्हा औरंगाबादला येतील की नाही? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून औरंगाबाद महापालिकेचा कारभार ठप्प झाला होता.

दरम्यान, राज्यात निर्माण झालेला सत्तापेच, राष्ट्रपती राजवट आणि त्यानंतर स्थापन झालेले महाआघाडीचे सरकार या काळात सत्ताधारी पक्षाकडून पुर्णवेळ महापालिका आयुक्त मिळावा यासाठी प्रयत्न झाले. आमदार अंबादास दानवे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे निवदेनाद्वारे तर प्रदीप जैस्वाल यांनी नुकतीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे महापालिकेला आयुक्त मिळावा म्हणून मागणी केली होती.

आयुक्त नसल्यामुळे शहरातील पाणी, ड्रेनेज, स्वच्छता, रस्ते, वीज आदी महत्वाचे प्रश्‍न प्रलंबित होते. सहा महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीला समोर जाण्यापुर्वी जनतेचे मुलभूत प्रश्‍न व शहराच्या विकासासंदर्भातील प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासाठी महापालिका आयुक्‍तांची नियुक्ती तातडीने होणे गरजेचे होते.

अखेर आज शासनाकडून बीडचे जिल्हाधिकारी अस्तीक कुमार पांडे यांची औरंगाबाद येथे महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले. निपुन विनायक (भाप्रसे) यांच्या जागी हे पद वरिष्ठ समय श्रेणीत अपग्रेड   करण्यात आल्याचे देखील या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच श्री. पांडे यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा असेही स्पष्टपणे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख