Assembly Election Analysis Chandrapur District | Sarkarnama

विधानसभा २०१९ : चंद्रपूर जिल्ह्यात थेट लढतीत आघाडी, युती दोघेही तुल्यबळ

प्रमोद काकडे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

लोकसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेसचा एकमेव खासदार निवडून आलेल्या जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत काट्याच्या लढतीचे चित्र आहे. लोकसभेतील विजयामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय, दुसरीकडे पराभवाचे उट्टे काढण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. 

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हा गृहजिल्हा. लोकसभेतील विजयामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आत्मविश्‍वास वाढलाय. देशभरात भाजपला लोकसभेत प्रचंड यश मिळाले. चंद्रपूर मात्र त्याला अपवाद ठरले, त्याचे शल्य मुनगंटीवारांना आहे. वडेट्टीवार यशाच्या पुनरावृतीसाठी, तर मुनगंटीवार लोकसभेतील नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यातील सहापैकी चार मतदारसंघ युतीत भाजपला, तर दोन शिवसेनेला सोडलेत. वडेट्टीवारांचा ब्रह्मपुरी मतदारसंघ शिवसेनेला दिल्यामुळे भाजपमध्येच नाराजी आहे. 

येथे शिवसेनेचे संघटनात्मक बळ नसताना, एकदा भाजप आमदार निवडून आला असताना, तो शिवसेनेला दिल्यावरून नाराजी आहे. शिवसेनेजवळही तगडा उमेदवार नव्हता; पण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी शिवसेनेत प्रवेश करून त्यांची चिंता कमी केली. दुसरीकडे आम आदमी पक्षातर्फे अॅड. पारोमिता गोस्वामी रिंगणात आहेत. मात्र, लढत वडेट्टीवार आणि गड्डमवार यांच्यातच होईल.

Image result for paromita goswami chandrapur

         पारोमिता गोस्वामी

चंद्रपूर अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. आमदार नाना शामकुळे यांच्याविषयी मतदारांत आणि पक्षातही नाराजी होती. लोकसभा निवडणुकीत शामकुळेंच्या मतदारसंघात कॉंग्रेसला मिळालेले मताधिक्‍य माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या समर्थकांच्या चांगलेच जिव्हारी लागले. अहीर समर्थक शामकुळेंच्या विरोधात होते; पण पक्षाने त्यांच्यावरच विश्‍वास ठेवलाय. कॉंग्रेसमध्ये उमेदवारांची गर्दी आहे. परंतु, विधानसभा लढू शकेल, असा एकही चेहरा नव्हता. त्यासाठी 2014 च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले शिवसेनेचे किशोर जोरगेवार यांना कॉंग्रेसमध्ये घेतले. तेच कॉंग्रेसकडून रिंगणात उतरतील असे वाटायचे; पण महेश मेंढेंचे नाव जाहीर झाले. परत राजी-नाराजीचा खेळ झाला आणि जोरगेवारांनाही पक्षाचा एबी फॉर्म मिळाला; पण त्यांचा एबी फॉर्म छाननीत त्रुटींमुळे नाकारला गेला. त्यामुळे जोरगेवारांना पक्षाची पसंती असून, ते अपक्ष झाले आणि पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश मेंढे ठरले.

बल्लारपूरमधून मुनगंटीवारांसमोर तुल्यबळ उमेदवार शोधताना कॉंग्रेसची दमछाक झाली. शेवटी डॉ. विश्‍वास झाडेंच्या नावावर शोध संपला. लोकसभेत जातीय समीकरणामुळे कॉंग्रेसला विजय मिळाला. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने बल्लारपूरमधून लक्षणीय मते घेतली. या पार्श्‍वभूमीवर डॉ. झाडेंची उमेदवारी महत्त्वाची ठरते. राजुरामधून भाजपचे आमदार संजय धोटेंनाच पक्षाने परत तिकीट दिले. शेतकरी संघटनेचे ऍड. वामनराव चटप यांनी आपली उमेदवारी घोषित केली. कॉंग्रेसने माजी आमदार सुभाष धोटेंना रिंगणात उतरवले, त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत अपेक्षित आहे. यात राष्ट्रवादीचे माजी आमदार सुदर्शन निमकरांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Image result for pratibha dhanorkar

            प्रतिभा धानोरकर

चिमूरमधून कीर्तिकुमार भांगडियांना परत भाजपची उमेदवारी मिळाली. कॉंग्रेसकडून सतीश वारजूकर रिंगणात आहेत. इथेही सरळ लढत आहे. वरोरा-भद्रावती मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष राहील. खासदार बाळू धानोरकर याच मतदारसंघातून शिवसेनेकडून विधानसभेसाठी निवडून आले होते. हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला गेलाय. खासदार धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा कॉंग्रेसकडून रिंगणात आहेत. त्यांच्या उमेदवारीला स्थानिक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध होता, तरीही त्यांना तिकीट मिळाले. इथेही शिवसेनेजवळ धानोरकरांनंतर तगडा नेता उरला नाही. अखेर कॉंग्रेस-भाजप असा प्रवास करून निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेशलेले संजय देवतळे शिवसेनेतर्फे रिंगणात असतील.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख