Ashwini Aher Fifth Generation in Nashik Zilla Parishad Politics | Sarkarnama

नाशिक जिल्हा परिषद सभापती अश्विनी आहेर...लोकल बोर्डापासूनची सत्ताकारणाची वारस

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 जानेवारी 2020

जिल्हा परिषदेच्या स्थापनेपूर्वी लोकल बोर्डापासून आहेर कुटुंब सत्ताकारणात आहे. या आहेर घराण्याची जिल्हास्तरीय नेतृत्वाच्या परंपरेला सुरुवात झाली ती त्यांची पणती अश्विनी पर्यंत कायम आहे. लोकल बोर्डापासून आजतागायत न्यायडोंगरीच्या आहेरांनी जिल्हा परिषदेत कायम महत्त्वाची भूमिका बजाविली आहे. 

नांदगाव : जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीतर्फे पहिल्यांदाच सदस्य झालेल्या अश्विनी आहेर सभापती झाल्या. त्याच्या माध्यमातून न्यायडोंगरीच्या आहेर कुटुंबीयांत गेले सत्तर वर्षे लोकल बार्डापासून सुरु असलेली परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे. त्यांचे पणजोबा कै. शिवराम वेडू पाटील लोकल बोर्डात पदाधिकारी होते. त्यांच्यापासून त्यांच्या प्रत्येक पिढीने जिल्हा परिषदेत विविध पदांवर काम केले आहे. गेल्या सत्तर वर्षांच्या परंपरेतील युवा वास्तुविशारद अश्विनी आहेर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. 

जिल्हा परिषदेच्या स्थापनेपूर्वी लोकल बोर्डापासून आहेर कुटुंब सत्ताकारणात आहे. या आहेर घराण्याची जिल्हास्तरीय नेतृत्वाच्या परंपरेला सुरुवात झाली ती त्यांची पणती अश्विनी पर्यंत कायम आहे. लोकल बोर्डापासून आजतागायत न्यायडोंगरीच्या आहेरांनी जिल्हा परिषदेत कायम महत्त्वाची भूमिका बजाविली आहे. 

स्वतः अॅड. अनिल आहेर 1998 मध्ये जिप चे अध्यक्ष झाले. त्यानंतर ते आमदार झाले त्यांच्या धर्मपत्नी सौ सुनीताताई आहेर यांनी 2 एप्रिल 2012 ते 20 पुढे अगदी अलीकडच्या तीन वर्षांपूर्वी पर्यंत जिल्हा परिषदेचे महिला बाल कल्याण सभापती पद भूषविले. त्यांची वास्तुविशारद असलेल्या कन्या अश्विनी आहेर यांना आज हे पद भुषविण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे अडीच वर्षापूर्वी अश्विनी आहेरा यांना आपल्या पहिल्या टर्म मध्येच उपाध्यक्ष पद मिळणार होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमधील समीकरणांमुळे ही संधी नयना गावितांना मिळाली.

एखाद्या कुटुंबाने एवढा काळ राजकारणात आपले वर्चस्व राखणे अन्य फारसे कुणाच्या वाट्याला आलेले नाही. सत्तेच्या राजकारणात राहूनही सलगतेने एखाद्या भागावर अथवा पंचक्रोशीवर असा प्रभाव केवळ न्यायडोंगरीच्या आहेर घराण्याच्याच वाट्याला आलेला दिसतो. जिल्हा परिषदेच्या स्थापनेच्या अगोदरच्या लोकल बोर्डाच्या राजकारणात कै शिवराम वेडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली वर्चस्व निर्माण केले. नंतरच्या पिढ्यातही ते बघावयास मिळते. 

नंतरच्या काळात (कै) भाऊसाहेब हिरे यांच्या विरोधात 'शेकाप' तर्फे (कै) शिवराम वेडू पाटील यांना विधानसभेसाठी उमेदवारी घोषित केली. त्यांचा हा आदर्श पाचव्या पिढीपर्यंत आहे. त्यांचे थोरले पुत्र लोकनेते (कै) अण्णासाहेब तथा गंगाधर शिवराम आहेर यांनीही जिल्हा परिषदेत दीर्घकाळ कामाचा ठसा उमटवला. 1972 मधील त्यांच्या पराभवाची कसर 1999 ला त्यांचे सुपुत्र अॅड. अनिल आहेर यांनी भरून काढली. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लगेचच आमदार झाले.

त्यानंतर श्रीमती विजयाताई आहेर पाच वर्षे सभापती होत्या. विलासराव आहेर यांनाही अशीच संधी मिळाली. अॅड. अनिल आहेरांच्या सुविद्य पत्नी सौ सुनीताताई आहेर जिल्हा परिषदेवर सदस्य व महिला व बालकल्याण सभापती राहिल्या. आता वास्तुविशारद असलेल्या त्यांच्या कन्या कुमारी अश्विनी आहेर सभापती झाल्या. जिल्हा परिषदेच्या सभागृहात अभ्यासू पद्धतीने प्रश्न मांडणाऱ्या तरुण सदस्यात त्यांचा समावेश होतो. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख