Ashwine Bidre murder case : AD Pradeep Gharat appointed Spl GP | Sarkarnama

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण :विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. प्रदीप घरत यांची नियुक्ती

सरकारनामा
बुधवार, 15 मे 2019

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अभिनेता सलमान खान याच्या हिट अँड रन प्रकरणात तसेच पत्रकार जे डे हत्याकांडात प्रकरणात सरकारच्या वतीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

नवी मुंबई :बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाच्या खटल्यात सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ऍड.प्रदीप घरत यांची नियुक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने नुकतेच याबाबतचे आदेश काढले आहेत. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम ऐवजी प्रदीप घरत यांची नियुक्ती करावी अशी मागणी बिद्रे कुटुंबीयांनी केली होती.त्यानुसार महाराष्ट्र शासनाने ही नियुक्ती केली आहे. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा खटला अलिबाग येथील सत्र न्यायालयात सुरु असून या खटल्यात सरकारतर्फे बाजु मांडण्यासाठी सरकारी वकिल म्हणून सुप्रसिद्ध ऍड.उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी सुरुवातीला बिद्रे कुटुंबियांनी केली होती.

मात्र नोव्हेंबर 2018 मध्ये बिद्रे कुटुंबियांनी हा खटला जलदगतीने चालविण्यात यावा तसेच या खटल्याचे कामकाज पहाण्यासाठी ऍड.प्रदिप घरत यांची नियुक्ती करावी अशी मागणी मुख्यमंत्री तसेच मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती. 

त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने गत 22 एप्रिल रोजी ऍड.प्रदिप घरत यांची या खटल्यात विशेष सरकारी वकिल म्हणून नियक्ती केली आहे. त्याचबरोबर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून ऍड.संतोष पवार यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.या खटल्यात विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती होताच ऍड.घरत यांनी या खटल्याच्या कामकाजाला सुरुवात देखील केली आहे. 

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अभिनेता सलमान खान याच्या हिट अँड रन प्रकरणात तसेच पत्रकार जे डे हत्याकांडात प्रकरणात सरकारच्या वतीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात देखील ऍड.प्रदिप घरत हे सर्व आरोपींना कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीने खटला चालवतील असा विश्वास अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी व्यक्त केला आहे. 

 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख