अश्‍विनी बिद्रेंच्या लॅपटॉपमधील शिवीगाळ व मारहाणीचे व्हिडिओ आणि ऑडिओ साक्षीदारांना दाखविले

...
ashwini bidre murder case
ashwini bidre murder case

नवी मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी पनवेल येथील सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत अश्‍विनी बिद्रे यांचे बंधू आनंद बिद्रे यांची इन कॅमेरा साक्ष नोंदविण्यात आली. या वेळी न्यायालयाकडून अश्‍विनी बिद्रे यांच्या कळंबोली येथील घरातून सापडलेल्या लॅपटॉपमधील शिवीगाळ व मारहाणीचे सर्व व्हिडिओ आणि ऑडिओ दाखवून, ऐकवून खात्री करून घेण्यात आली.

दरम्यान, या सुनावणीच्या वेळी सदर हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, राजेश पाटील आणि महेश फळणीकर या तिन्ही आरोपींची ओळखपरेडसुद्धा करण्यात आली. तसेच या गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाची सत्यता पडताळणी करण्यात आली. येत्या आठ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत आनंद बिद्रे यांची उलट तपासणी घेण्यात येणार आहे.

अश्‍विनी बिद्रे हत्याकांडाची सुनावणी गेल्या 18 ऑक्‍टोबरपासून पनवेल येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. राजेश अस्मर यांच्या न्यायालयात सुरू असून, पहिलीच साक्ष तक्रारदार आनंद बिद्रे यांची घेण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी आनंद बिद्रे यांची उर्वरित साक्ष नोंदविण्यात आली. सकाळी 11.30 वाजल्यापासून सुरू झालेली साक्ष दुपारी जेवणाच्या सुटीनंतर सायंकाळी पावणेपाचपर्यंत सुरू होती. या वेळी न्यायालयाकडून या हत्याकांडातील महत्त्वाचे पुरावे असलेले अश्‍विनी बिद्रे यांच्या लॅपटॉपमधील सर्व ऑडिओ, व्हिडिओ दाखवून व ऐकवून त्यांची खात्री करून घेण्यात आली. तसेच त्यातील कुठले व्हिडिओ-ऑडिओ पुरावे महत्त्वाचे आहेत, हेसुद्धा जाणून घेतले.

या वेळी न्या. राजेश अस्मर यांनी अश्‍विनी बिद्रे हत्याकांडासंबंधात आनंद बिद्रे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत विचारणा करून त्याबाबत आनंद बिद्रे यांच्याकडून स्पष्टीकरण घेतले. त्यानंतर या खटल्यात ही याचिका रेकॉर्डवर घेण्यात आली. या वेळी न्या. अस्मर यांनी अश्‍विनी बिद्रे यांची मुलगी सूची गोरे हिची कोठडी कुणाकडे, कधीपासून आहे, याबाबत विचारणा केली. त्यामुळे शुक्रवारच्या सुनावणीत राजू गोरे यांनी आपली मुलगी सूची गोरे हिलाही न्यायालयासमोर हजर केले होते.

या वेळी न्यायालयाने सूची गोरे हिची साक्ष नसल्यास तिला बाहेर थांबण्यास सांगितले. ही सुनावणी विशेष सरकारी वकील ऍड. प्रदीप घरत आणि ऍड. संतोष पवार (रायगड जिल्हा सरकारी वकील) यांनी पूर्ण केली. या सुनावणीप्रसंगी सहायक पोलिस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो, संदीप वाघमोडे आणि गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजय कदम उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com