शिरूरमध्ये अशोक पवारच राष्ट्रवादीत `बाजीगर`

शिरूरमध्ये अशोक पवारच राष्ट्रवादीत `बाजीगर`

पुणे : शिरूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता होती. अखेरीस माजी आमदार अशोक पवार यांनी बाजी मारत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यावर मात केली. आता कंद हे काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.

 शिरूर-हवेलीमध्ये अशोक पवार यांनी प्रदीप कंद, मंगलदास बांदल यांच्यावर मात करत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तिकिट आणले. त्यांनी आपल्या प्रचाराचा पहिला दौरा पूर्णही केला आहे. पवार आणि भाजपचे उमेदवार बाबूराव पाचर्णे यांच्यात तिसऱ्यांदा लढत होणार आहे. कंद यांनीही अभी नही तो कभी नही, अशी भूमिका घेत विधानसभा निवडणुकीची तयारी केली होती. ते बंड करणार की राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आदेश मानणार, हे लवकरच कळेल. अजित पवार यांच्या जवळचे म्हणून अशोक पवार ओळखले जातात. 

इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांना राष्ट्रवादी काॅंग्रेसने  उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे तेथे राष्ट्रवादीचे दुसरे इच्छुक अप्पासाहेब जगदाळे काय करणार याची उत्सुकता आहे. बारामतीत भाजपकडून गोपीचंद पडळकर उभे राहिल्याने त्या शेजारी असलेल्या इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादीला धनगर समाजाचे असलेल्या भरणे यांना उमेदवारी देणे आवश्यक ठरले होते.

भरणे यांच्या उमेदवारीचा फायदा कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांनाही होणार आहे. भरणे आणि भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यात आता 2019 मध्ये तिसऱ्यांदा सामना रंगणार आहे. 2009 च्या निवडणुकीत भरणे अपक्ष म्हणून उभे होते. त्यावेळी त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये त्यांनी पाटील यांचा पराभव केला. आता 2019 मध्ये काय होणार याची उत्सुकता आहे.

भरणे यांना उमेदवारी मिळणार होती, हे लक्षात आल्यानेच हर्षवर्धन पाटील यांनी काॅंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पडळकर हे बारामतीत उभे राहणार असल्याची घोषणा झाल्याने भरणे यांना उमेदवारी देणे आणखी गरजेचे ठरले. 

भरणे हे निवडणूक लढविणार नसल्याची अफवा आज इंदापुरात पसरली होती. त्यामुळे भरणे यांना उमेदवारी मिळणार की नाही, याची उत्सुकता होती. अखेर भरणे यांनी बाजी मारलीच.

जुन्नर मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे राहिला असून तेथे अतुल बेनके यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांचा सामना तेथे शिवसेनेचे शरद सोनवणे यांच्याशी होणार आहे. काॅंग्रेसचे सत्यशील शेरकर हे काय करणार याची उत्सुकता आहे. बेनके यांचा अर्ज भरण्यासाठी खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत.

दौंडमध्ये अपेक्षेप्रमाणे रमेश थोरात यांना उमेदवारी मिळाली आहे. येथेही थोरात व रासपचे राहुल कुल यांच्यात तिसऱ्यांदा सामना होणार आहे. खेडमध्ये प्रबळ इच्छुक दिलीप मोहिते यांची उमेदवारी जाहीर न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  मावळ मतदारसंघातही राष्ट्रवादीने आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com