अशोक पवार यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

अशोक पवार यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

शिरूर ः शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी बुधवारी रात्री उशिरा माजी आमदार ऍड. अशोक पवार यांना जाहीर झाली. त्यांनी आज येथे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी शिरूर व हवेली तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिरूर बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर रॅलीला सुरवात झाली. रॅलीसाठी सजविलेल्या वाहनावर डॉ. कोल्हे व ऍड. पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, युवा नेते आदित्य धारिवाल, कॉंग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष कौस्तुभ गुजर, हवेलीच्या सभापती हेमलता काळोखे, शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती जयमाला जकाते आदींसह प्रमुख पदाधिकारी होते.


रॅलीपूर्वी झालेल्या सभेत डॉ. कोल्हे म्हणाले, ""लोकसभा निवडणुकीत शिरूरच्या जनतेने दिलेल्या कौलाची पुनरावृत्ती करावी. अशोक पवार हे शेतकरी समाजाशी नाळ जोडलेले, विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व आहे. या मतदारसंघाला पुढे नेण्यासाठी त्यांना साथ दिली पाहिजे. त्यांच्या आमदारकीच्या काळात झालेली विकासकामे आणि गेल्या पाच वर्षांत मतदारसंघाची लागलेली वाट, याचा गांभीर्याने विचार करावा. त्यामुळे ऍड. पवार यांच्यासारखे अभ्यासू व दूरदृष्टी असलेले लोकप्रतिनिधीच राज्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी पाठवावे लागतील.''

गारटकर म्हणाले, ""पक्षाने सर्व बाबींचा विचार करून ऍड. पवार यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारीच्या शर्यतीत अग्रस्थानी असलेले प्रदीप कंद हे उमेदवारी न मिळाल्याने नाराज असले; तरी ते दोन दिवसात राष्ट्रवादीच्या प्रचारात येतील.''

ऍड. पवार यांनी आमदार पाचर्णे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ते म्हणाले, ""मोदी लाट आणि गाजराच्या शेतीला लोक भुलल्याने ते निवडून आले, पण पाच वर्षात ते कामाचे ना धामाचे असल्याचे दिसले आहे. त्यांचा सर्व कारभार नियोजनशून्य असून, कोट्यवधीची कामे केल्याच्या केवळ वल्गना आहेत.''

या वेळी शिरूर बाजार समितीचे संचालक विकास शिवले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविबापू काळे यांनी स्वागत केले. हवेलीचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com