तिकिट जाहीर होण्याआधीच अशोक पवारांचा मतदारसंघाचा दौरा पूर्ण

तिकिट जाहीर होण्याआधीच अशोक पवारांचा मतदारसंघाचा दौरा पूर्ण

शिरूर ः विधानसभेच्या सलग दोन निवडणुकांत जित-हार या दोन्हींचा अनुभव असलेले माजी आमदार ऍड. अशोक पवार यांनी या निवडणुकीसाठी तडाखेबंद नियोजन केले असून, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच झंझावाती प्रचाराने संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढला आहे. निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच त्यांचा शिरूर-हवेलीचा एक दौरा पूर्ण झाला आहे.

कार्य अहवालांचे वाटप, सोशल मीडियावरून केली जाणारी कामांची वैशिष्ट्यपूर्ण जाहिरात यात त्यांनी आघाडी घेतली असून, वाड्या-वस्त्यांवर प्रत्यक्ष भेटीगाठीतून त्यांनी प्रचार मोहिमेला वेग दिला आहे. मूळचे शिरूर-हवेली मतदारसंघातील; पण कामधंद्यानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या मतदारांची त्यांनी नुकतीच पुण्यातील विविध भागांत जाऊन भेट घेतली. विविध सोसायट्यांतून राहावयास असलेल्या शिरूर-हवेलीकरांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

अभ्यासू वृत्ती, प्रशासकीय कामांची खडान्‌ खडा माहिती आणि जनमानसावर मजबूत पकड असलेले ऍड. पवार यांनी, तसेच "मॅनेजमेंट'मध्ये निष्णात असलेल्या त्यांच्या "टीम'ने शिस्तबद्ध प्रचारयंत्रणेतून घरोघरी भेट देऊन प्रत्येक माणसाशी संवाद साधण्यावर, भेट घेण्यावर भर दिला आहे. पुण्यातील काही सोसायट्यांत, तसेच तळेगाव ढमढेरे भागात नवरात्रीनिमित्त विविध मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. त्या वेळी देवीची आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली.

आमदार बाबूराव पाचर्णे यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी काल जाहीर झाली असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवार यादी अद्याप गुलदस्तात आहे. तरीही, उमेदवारीचे स्पष्ट संकेत वरिष्ठांकडून मिळाल्याने ऍड. पवार यांनी गेल्या दोन महिन्यांपासून संपर्क मोहीम सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात शिरूर तालुक्‍यातील, तर दुसऱ्या टप्प्यात हवेलीतील गावांना, तसेच वाड्या-वस्त्यांना भेट देऊन त्यांनी मतदारांशी संपर्क साधला.

वर्षानुवर्षे त्याच समस्या, त्याच प्रश्‍नावर निवडणुका होतात. हे चित्र बदलण्याचा मानस आहे. आज जग एकविसाव्या शतकाकडे जात असताना, सर्वच क्षेत्रांत अमूलाग्र बदल होत असताना, झपाट्याने विस्तारवाढ होत असताना, विकासाच्या संकल्पना बदलत असताना पुढच्या पिढीचा, तरुणाईचा विचार डोळ्यांसमोर ठेवून नियोजनबद्ध काम करण्याचा संकल्प आहे. सार्वजनिक प्रश्‍न सोडविताना वैयक्तिक विषयांवरही अधिक गंभीरपणे काम करण्याचा मानस आहे, `असे अशोक पवार यांनी या वेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com