Ashok Gehlot ,a conjurer's son tricked Sachin Pilot | Sarkarnama

सचिन पायलटना 'जादूगाराचा मुलगा' पडला भारी  !

सरकारनामा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

कमी वेळात राज्यकारभारावर पकड मिळवून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाला चांगले वातावरण निर्माण करण्याचे कौशल्य या अनुभवी नेत्याकडे आहे.

दिल्ली : राजस्थानचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले अशोक गेहलोत यांचे वडील लक्ष्मण गेहलोत  जादूगार होते. त्यांच्या मदतीसाठी गावोगावी दौरे करताना अशोक गेहलोत यांनी जादू शिकून घेतलेली होती. मी राजकारणात आलो नसतो तर जादूगारच झालो असतो ,असे अशोक गेहलोत  यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले होते .

गेहलोत राजकारणात आले तरी त्यांनी जादूविद्या सोडलेली दिसत नाही .  अशोक गेहलोत यांनी गांधी घराण्यावर केलेली जादू व्हार्टन विद्यापीठातून एमबीए केलेल्या सचिन पायलट यांना अखेर भारी पडली . 

कॉंग्रेस पक्षाचा मास्टर स्ट्रॅटेजिस्ट म्हणून दबदबा असलेल्या अशोक गेहलोत आगामी लोकसभा निवडणुकीत राजस्थानात आपली जादू दाखवणार का? याकडे हायकमांडचे लक्ष लागलेले आहे.

लोकसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने राजस्थानमधील सर्व पंचवीस जागा जिंकलेल्या होत्या. कॉंग्रेस पक्षाला राष्ट्रीय स्तरावर सत्ता मिळवायची तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र याबरोबरच राजस्थानमध्येदेखील चांगले यश मिळणे आवश्‍यक आहे.

राजस्थानमध्ये कॉंग्रेस पक्षाचे 101 आमदार निवडून आले. जेमतेम काठावरचे बहुमत असल्याने अपक्ष आणि कॉंग्रेस बंडखोर आमदारांना जोडून घेऊन सत्तेवर पकड घट्ट करण्याचे कौशल्य श्री. गेहलोत यांच्याकडे आहे. शिवाय कमी वेळात राज्यकारभारावर पकड मिळवून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाला चांगले वातावरण निर्माण करण्याचे कौशल्य या अनुभवी नेत्याकडे आहे.

राजकीय डावपेचात ते निष्णात असून त्यांचे संघटन कौशल्य चांगले आहे. वयाच्या 34 व्या वर्षी राजस्थान प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्षपद मिळविणाऱ्या अशोक गेहलोत यांना इंदिरा गांधींनी हेरले. वयाच्या 29 व्या वर्षी 1980 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले.

खासदार होताच त्यांना केंद्रात पर्यटन राज्यमंत्री पद मिळाले होते . 1980 ते 1998 या काळात सलग पाच  वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे.

राजकीय नेते कारकिर्दीची सुरवात राज्यातून करतात आणि नंतर दिल्लीला जातात. अशोक गेहलोत यांच्या बाबतीत असे घडले नाही. केंद्रीय राजकारणात प्रदीर्घ काळ घालविल्यानंतर राजस्थानच्या राजकारणात सक्रिय झाले आणि मुख्यमंत्रीही झाले. 1999 ते 2003 आणि 2003 ते 2008 असे दोन टर्म त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहे.

संजय गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आदी नेत्यांबरोबर काम केल्यानंतर राहुल गांधी यांनीही त्यांना आपल्या टीममध्ये महत्त्वाची भूमिका दिली. कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करताना गुजरात विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर होती. या निवडणुकीत त्यांनी भाजपची दमछाक केली.

तर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपची संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली असतानाही त्यांनी जनता दल सेक्‍युलर पक्षाला कॉंग्रेस बरोबर ठेवून सरकार स्थापन केले. त्यावेळी गुलाम नबी आझाद आणि अशोक गेहलोत या जोडीने कॉंग्रेस पक्षासाठी पराकोटीचे डावपेच लढविले होते, असे वरिष्ठ कॉंग्रेस जन सांगतात.

अर्थशास्त्र आणि कायद्याचे अभ्यासक असलेले अशोक गेहलोत आज 67 वर्षांचे आहेत. साधी राहणी, मोठा जनसंपर्क आणि सर्वांना सहज उपलब्ध असल्यामुळे त्यांचा मोठा प्रभाव आहे. गांधी घराण्याशी असलेली निष्ठा आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव या जोरावरच गेहलोत यांनी पायलट यांचे आव्हान परतवून लावले आहे.

रुसलेल्या सचिन पायलटांनी छत्तीस तासानंतर राहुल गांधींचे ऐकले !

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख