नाईकांविरूद्ध लढणारे अशोक गावडे आता नवी मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष

नवी मुंबईत राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी काम करणार आहे. नवी जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यकारणी तयार केली जाणार आहे. त्यानंतर नवी मुंबईत राष्ट्रवादीचा मोठा मेळावा घेणार आहे.-अशोक गावडे, नगरसेवक व जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी
Navi-Mumbai
Navi-Mumbai

नवी मुंबई  : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी नगरसेवक अशोक गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश सचिव प्रशांत पाटील यांची नवी मुंबईच्या निरीक्षक पदी नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गावडे व पाटील यांच्या नियुक्‍त्या जाहीर केल्या. गावडेंची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करून राष्ट्रवादीची जुनी  कार्यकारण बरखास्त झाल्याने राष्ट्रवादीतून भाजपच्या वाटेवर असलेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांना पक्षश्रेष्टींनी दणका दिला आहे. 

गणेश नाईकांचे धाकटे पूत्र माजी आमदार संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ काही महिन्यांनी गणेश नाईक देखील भाजपमध्ये डेरेदाखल होणार असल्याची चर्चा आहे. संदीप नाईकांच्या भाजपप्रवेशाबाबत गणेश नाईक यांनी अद्यापही आपल्या प्रवेशाबाबत मौन सोडलेले नाही. त्यांनी बाळगलेले मौन ते भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्टींसहीत नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. 

नाईकांसोबत भाजपमध्ये राष्ट्रवादीचे 52 नगरसेवक जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने नगरसेवक भाजपमध्ये गेल्यास नवी मुंबईत राष्ट्रवादी औषधाला तरी उरेल का असा टोला काही भाजपवाशी नगरसेवकांकडून मारला जात होता. मात्र भाजपमध्ये न जाता राष्ट्रवादीतच राहण्यावर 25 नगरसेवकांनी ठाम भूमिका मांडली आहे. या नगरसेवकांना एकत्र करण्यात नगरसेवक अशोग गावडे यांना यश आले आहे. सुरूवातीला गावडेंसोबत राष्ट्रवादीचे 15 नगरसेवक होते. आता यात वाढ होऊन 25 नगरसेवक झाल्याचा गावडेंनी दावा केला आहे. 

गावडेंसोबत असलेल्या नगरसेवकांनी एकत्र करून शनिवारी शरद पवार यांची एक छोटेखानी भेटही संपन्न झाली होती. या भेटीत पवार यांनी जूनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे गावडे यांची नवी मुंबईच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यामुळे आधीच्या कार्यकारणीचे जिल्हाध्यक्ष अनंत सूतार यांना पायउतारा व्हावे लागले आहे. सूतार यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा पदाधिकारी व तालुका पातळीवरील पदाधिकारीही बरखास्त झाले आहेत. 


नवी मुंबईत राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी काम करणार आहे. नवी जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यकारणी तयार केली जाणार आहे. त्यानंतर नवी मुंबईत राष्ट्रवादीचा मोठा मेळावा घेणार आहे. 

-अशोक गावडे, नगरसेवक व जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com