ashok gaikwad about satara loksabha ticket | Sarkarnama

RPI चे अशोक  गायकवाड हिंमत हारलेले नाहीत, उदयनराजेंना पुन्हा आव्हान देणार ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

2014 च्या लोकसभा निवडणुकीत सेना, भाजप आणि आरपीआयची महायुती होती. राज्यातील एकमेव साताऱ्याची जागा आरपीआयला सोडण्यात आली. तिथे अशोक गायकवाड उमेदवार होते. संपुर्ण देशात मोदी लाट होती, मात्र साताऱ्यात महायुतीचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर गेला. आरपीआयच्या उमेदवाराच्या प्रचाराचे कष्टही सेना भाजपच्या नेत्यांनी घेतले नव्हते. 

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडावा, तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळेस रिपब्लिकन पक्षाला मदत करावी, अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे करणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सांगितले. 

सातारा लोकसभा मतदारसंघातून नेमके कोण कोण उमेदवार असणार, याबाबत जिल्ह्यात अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. राष्ट्रवादीतून खासदार उदयनराजे भोसले यांनी यापूर्वीच आपली उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोण लढणार याची उत्सुकता आहे. गेल्यावेळी भाजपने मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला सातारा लोकसभेची जागा दिली होती. त्यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. अशोक गायकवाड यांना उदयनराजेंच्या विरोधात 71 हजार 808 मते मिळाली होती. तर अपक्ष पुरूषोत्तम जाधव यांना एक लाख 55 हजार, 789 मते तर राजेंद्र चोरगे यांना 82 हजार 352 मते मिळाली होती. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारास चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. 

आता यावेळेस भाजप, शिवसेना युती व मित्र पक्ष सातारा लोकसभा मतदारसंघावर लक्ष ठेऊन आहे. शिवसेना स्वतंत्र उमेदवार उभा करणार आहे. भाजपमधून पुरूषोत्तम जाधव इच्छुक आहेत. पण मागील वेळी सातारा लोकसभा भाजपने रिपब्लिकन पक्षाला सोडली होती. येथून अशोक गायकवाड यांनी निवडणूक लढली होती. यावेळेस त्यांची भुमिका काय राहणार या विषयी श्री. गायकवाड यांच्याकडून जाणून घेतले. 

श्री. गायकवाड म्हणाले, मागील वेळी मी रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होतो. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने मला मदत केली होती. तर शिवसेनेने माझ्या विरोधात काम केले होते. तरीही मला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यावेळेस आम्ही सातारा लोकसभा मतदारसंघ पुन्हा रिपब्लिकन पक्षाला सोडावा, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे करणार आहोत. मी स्वत: येथून निवडणुक लढण्यास तयार आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळेसही भाजपने मला मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख