नांदेडात अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला

नांदेडात अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला

नांदेड : सोन्याच्या ताटावरून केळीच्या पानावर आलेली कॉंग्रेस सरस ठरणार की शेवटच्या टप्यात युती फिस्कटल्यामुळे स्वबळावर लढण्यासाठी उमेदवारांची शोधाशोध करणारे शिवसेना, भाजप बाजी मारणार याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

गेला आठवडाभर ग्रामीण भाग प्रचारसभा, कोपरा सभा, प्रचारफेऱ्यांनी ढवळून निघाला आहे. नांदेड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या निवडणुकीत चव्हाण बाजी मारणार का की विरोधक आपल्या ताब्यात सत्ता घेणार का ? याची उत्सुकता आहे.
नांदेड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेवर सातत्याने कॉंग्रेसचीच सत्ता राहिली आहे. अधून मधून शिवसेना आणि राष्ट्रवादीला थोडे फार प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. नांदेड जिल्ह्यातील निवडणुका या नेहमीच अशोक चव्हाण विरुद्ध विरोधक एकत्र अशाच पाहायला मिळाल्या आहेत. सर्व विरोधक एकत्र झाले तर त्याचा फटका कॉंग्रेसला बसू शकतो. याची जाणीव चव्हाण यांना असल्यामुळे त्यांनी देखील त्याची पुरेपूर काळजी घेत विरोधकांना वेगवेगळे ठेवण्यात यंदा यश मिळविले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर पुन्हा एकदा कॉंग्रेसला बऱ्यापैकी यश मिळण्याची शक्‍यता आहे.

मागील वेळेस जिल्हा परिषदेमध्ये कॉंग्रेसला जागा मिळाल्या होत्या. बहुमतासाठी आठ ते दहा जागांचे गणित चव्हाण यांनी व्यवस्थित सोडविले आणि पाच वर्षे सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. यंदाच्या निवडणुकीतही जिल्हा परिषदेमध्ये ते जागा मिळविण्यासाठी सुरवातीपासूनच कॉंग्रेसच्या वतीने त्यांनी फिल्डिंग लावली होती.

भाजपने अधिकचा विजय संकल्प केला असला तरी सुरवातीपासून शिवसेनेसोबत युती होण्यावरच त्यांचा भर होता. मागील नगरपालिका निवडणुकीत चव्हाण यांचे विरोधक एकत्र होऊन लढले असते तर कॉंग्रेसचा फायदा झाला नसता हे लक्षात आले होते. त्यामुळे आता युती करायचीच त्याचबरोबर राष्ट्रवादीला देखील छुप्या पद्धतीने सोबत घ्यायचे, अशी व्यूहरचना भास्करराव पाटील खतगावकर यांनी आखली होती. त्या दृष्टीने सारे जुळूनही आले होते मात्र वरूनच युती फिस्कटल्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची गोची झाली. त्यामुळे शेवटच्या टप्यात त्यांना उमेदवारासाठी शोधाशोध आणि धावपळ करावी लागली. दुसरीकडे राष्ट्रवादीलाही आघाडी करता आली नसल्याने त्यांनाही सर्व जागांवर उमेदवार मिळाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. इतरही पक्ष निवडणूक रिंगणात असले तरी त्यांचे अस्तित्व नगण्यच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com