Ashok Chavan Tellin Lie claims Imtiaz Jaleel | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

अशोक चव्हाण खोटारडे, प्रकाश आंबेडकरांशी कुठलीच बोलणी सुरू नाहीत - इम्तियाज जलील यांचा दावा 

जगदीश पानसरे 
बुधवार, 5 डिसेंबर 2018

इम्तियाज जलील तेलंगणा विधानसभा निवडणुक प्रचारासाठी सध्या हैदराबादेत आहेत. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने अमरावतीत झालेल्या सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आघाडी संदर्भात आपली प्रकाश आंबेडकरांशी बोलणी सुरू असल्याचे विधान केले. तसेच 'एमआयएम'ला कुठल्याही परिस्थितीत सोबत घेणार नाही याचा पुनरूच्चार देखील त्यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील यांनी अशोक चव्हाण खोटं बोलत असल्याचा आरोप केला. 

औरंगाबाद : "गेल्या लोकसभा निवडणुकीत दोन जागा जिंकलेल्या काँग्रेसला सध्या माज आला आहे. प्रकाश आंबेडकरांशी आमची आघाडीबाबत बोलणी चालू आहे असे सांगणारे अशोक चव्हाण खोटारडे आहेत. मी स्वतः आंबेडकरांशी बोललो आहे. काँग्रेसकडून आघाडी संदर्भात कुठल्याच प्रकारची बोलणी किंवा चर्चा माझ्याशी झालेली नाही", असे त्यांनी स्पष्ट केले आहे. कॉंग्रेसकडून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप 'एमआयएम'चे आमदार व महाराष्ट्रातील नेते इम्तियाज जलील यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना केला. 

इम्तियाज जलील तेलंगणा विधानसभा निवडणुक प्रचारासाठी सध्या हैदराबादेत आहेत. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने अमरावतीत झालेल्या सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आघाडी संदर्भात आपली प्रकाश आंबेडकरांशी बोलणी सुरू असल्याचे विधान केले. तसेच 'एमआयएम'ला कुठल्याही परिस्थितीत सोबत घेणार नाही याचा पुनरूच्चार देखील त्यांनी केला. 

या संदर्भात इम्तियाज जलील यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ''दलित मतदार आपल्यापासून दूर जाऊ नयेत, यासाठी अशोक चव्हाणांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची बोलणी सुरू असल्याचा उल्लेख ते वारंवार करतात, 'एमआयएम'ला सोबत घेणार नाही, हे ही सांगतात. परंतू, हा सगळा प्रकार म्हणजे खोटारडेपणा आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे." 

"अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यांशी मी स्वतः या विषयी बोललो आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत काँग्रेसकडून आघाडी संदर्भात कसल्याच प्रकारची बोलणी किंवा विचारणा माझ्याकडे झाली नसल्याचे सांगत त्यांनी अशोक चव्हाणांचा खोटारडेपणा उघड केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर साहेंबानी पुर्वीच काँग्रेसकडे राज्यातील बारा लोकसभेच्या जागा आम्हाला द्या, असा प्रस्ताव दिला होता. यावर काँग्रेस काहीच बोलायला तयार नाही, एक जागा देणार की दोन जागा देणार? केवळ आमची बोलणी सुरू आहे, 'एमआयएम'ला सोबत घेणार नाही हेच टुमणे त्यांच्याकडून सुरू आहे. राहिला प्रश्‍न 'एमआयएम'ला सोबत न घेण्याचा, तर आम्ही कधी बोललो होतो की आम्हाला काँग्रेस सोबत जायचे आहे.'' असेही जलील म्हणाले.  

काँग्रेस, भाजप- शिवसेना आमच्यासाठी एकच आहे. त्यामुळे काँग्रेस सोबत जर आम्हीच जाणार नाही तर ते आम्हाला सोबत घेणार नाही हे कशाचा आधारावर सांगत आहेत अशा शब्दांत इम्तियाज जलील यांनी अशोक चव्हाणांच्या वक्तव्यांची खिल्ली उडवली. 

राष्ट्रवादीचा दावाही खोटाच....
''काही महिन्यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील 'एमआयएम'ला आम्ही सोबत घेण्यास तयार आहोत, असे विधान केलेहोते. त्यांनीही 'एमआयएम'शी चर्चा सुरू असल्याचा दावा केला होता. मग प्रश्‍न निर्माण असा होतो की त्यांनी कुणाशी चर्चा केली. 'एमआयएम'चे सगळे निर्णय स्वतः असदुद्दीन ओवेसी हे घेतात, किंवा महाराष्ट्रात मला बोलायला सांगतात. ओवेसी किंवा माझ्याशी अशा प्रकारची कुठलीच चर्चा किंवा बोलणी अद्यापपर्यंत झालेली नाहीत. मग जयंत पाटीलांनी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती का?'' असा उपरोधिक सवाल करतांनाच राष्ट्रवादीचा दावा देखील खोटा असल्याचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख