लोकसभेला हरलेले अशोक चव्हाण, शेट्टी, हर्षवर्धन जाधवांसह अनेक दिग्गजांना विधानसभेचे वेध

लोकसभेला हरलेले अशोक चव्हाण, शेट्टी, हर्षवर्धन जाधवांसह अनेक दिग्गजांना विधानसभेचे वेध

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान लक्षात घेऊन इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात चांगली मते मिळाली आहेत तेथून अपक्ष तसेच लहानमोठ्या पक्षाचे पराभूत उमेदवार विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे.

 
येत्या ऑक्‍टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी काही उमेदवारांनी अपक्ष म्हणून किंवा लहान पक्षाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली. लोकसभेच्या निमित्ताने या उमेदवारांना विधानसभेसाठी किती मेहनत घ्यावी लागेल किंवा कोणती रणनीती ठरवावी लागेल याचा अंदाज आला आहे. त्यादृष्टीने पुढील पाच महिने इच्छुक उमेदवार कामाला लागलेले दिसतील.

औरंगाबाद लोकसभा मतदासंघात अपक्ष म्हणून लढणार्या हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाखांहून अधिक मते घेतली. लोकसभेला पराभव झाला असला तरी ते कन्नडमधून विधानसभेची निवडणूक लढवतील. भंडारा-गोंदियात पराभूत झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुध्दे, बुलढाण्यातील डॉ. राजेंद्र शिंगणे, वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरसकर, धुळ्यातील आमदार कुणाल पाटील, अनिल गोटे, दिंडोरीचे धनराज महाले, गडचिरोलीतील कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी, रमेशकुमार गजबे हे विधानसभेसाठी दावा करण्याची दाट शक्‍यता आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे दोन टर्म प्रितनिधीत्व केलेले शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना या निवडणुकीत शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी पराभूत केले. 2009 मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक लढणारे शेट्टी आधी आमदार होते. 2004 मध्ये ते शिरोळमधून निवडून गेले होते. लोकसभेला पराभूत झाल्याने शेट्टी 15 वर्षानंतर विधानसभेची निवडणूक लढवू शकतात. जळगावमधून राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांचा पराभव झाला. त्यामुळे देवकर पुन्हा एकदा विधानसभेला आपले नशीब अजमावून पाहू शकतात. माढामधून राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे, नागपूरमधील कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले, नंदूरबारमधील पराभूत के. सी. पाडवी हे विधानसभेचे उमेदवार असू शकतात.

 
कॉंंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार नव्हते. तरीही कॉंग्रेसने त्यांनाच उमेदवारी दिली. आता चव्हाण विधानसभेची निवडणूक लढण्याची दाट शक्‍यता आहे. नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांनी युतीच्या उमेदवाराविरोधात बंड केले होते. त्यामुळे ते सिन्नरमधून निवडणूक लढवू शकतात. उस्मानाबादमधून राणा जगजीतसिंह पाटील, सांगलीतील वंचित बहुजनचे गोपीचंद पडळकर, विशाल पाटील, शिर्डीतील भाऊसाहेब कांबळे विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. 

लोकसभेतील पराभूतांची विधानसभेसाठी तयारी 
अशोक चव्हाण : भोकर 
राजू शेट्टी : शिरोळ 
हर्षवर्धन जाधव : कन्नड 
बळीराम सिरसकर : बाळापूर 
के. सी. पाडवी : अक्कलकुवा 
कुणाल पाटील : धुळे ग्रमीण 
अनिल गोटे : धुळे शहर 
माणिकराव कोकाटे : सिन्नर 
भाऊसाहेब कांबळे : श्रीरामपूर 
नाना पटोले : साकोली 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com