Ashok chavan greets Sharad Pawar on his birthday | Sarkarnama

शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी अशोक चव्हाण हजर झाले

संजय मिस्कीन  
बुधवार, 12 डिसेंबर 2018

.

मुंबई : तीन राज्यात भाजपकडून सत्ता हिरावून घेतलेल्या काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात दाखल झाले होते . 

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडीसाठी जागावाटपाच्या फैरी झडत असताना काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी स्वतः जाऊन पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आघाडीसाठी वातावरण निर्मिती केली . 

 वयाची अठ्ठयाहत्तरी, चेहऱ्यावर कोणताही थकवा नाही, प्रत्येकाला हसतमुखाने व व्यक्‍तीगत ओळख दाखवत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज सलग चार तास उभे राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारल्या. 

आज वाढदिवसानिमीत्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधे शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातून सर्वपक्षिय कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी व सामान्य नागरीकांनी रांगा लावल्या होत्या.

प्रत्येकाशी हस्तांदोलन करत तर कधी पाठीवर प्रेमाने हात फिरवत पवारांनी शुभेच्छा स्विकारल्या. कित्येकांनी त्यांच्या सोबत उभं राहून फोटो देखील काढून घेतले. पवार यांचा असा हा आगळावेगळा व अत्यंत साधेपणानं वाढदिवस साजरा झाला.

राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी " चला मदतीचा हात देवू' या उपक्रमाचा शुभारंभ देखील पवार यांनी आज वाढदिवसाचे निमित्त साधत केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या 78 व्या वाढदिवसाचा शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या लोकनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी रांगाच रांगा लावल्या होत्या.

 यावेळी कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कर्नाटकचे माजी गृहमंत्री पी.जी.आर.सिंदिया यांची उपस्थिती होती.

सुरुवातीला राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते पाटील,राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,

विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री मनोहर नाईक, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड,पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी नेत्यांसह सर्व आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.शिवाय राजपत्रित अधिकारी आणि एमसीएचे पदाधिकारी यांनीही शरद पवार यांना  शुभेच्छा दिल्या.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख