भाजप-सेना म्हणजे आपण दोघे भाऊ-भाऊ, सगळे मिळून खाऊ - अशोक चव्हाण

भाजप-सेना म्हणजे आपण दोघे भाऊ-भाऊ, सगळे मिळून खाऊ - अशोक चव्हाण

गोंदिया : भाजप व शिवसेनेची युतीची चर्चा म्हणजे आपण दोघे भाऊ-भाऊ, सगळे मिळून खाऊ, या प्रकारची असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज गोंदियात केली. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीची जनसंघर्ष यात्रेचे शुक्रवारी (ता. 11) जनसंघर्ष गोंदियात आगमन झाले. यावेळी जाहीरसभेत ते बोलत होते. 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राची जनता भाजप व शिवसेनेतील शिमगा पाहत आहे. शिवसेना, भाजप सध्या एकमेकांत भांडत आहेत. हे भांडण केवळ दिखाऊपणाचे आहे. एकीकडे भाजपवर टीका करायची व दुसरीकडे सत्तेचे श्रीखंड खायचे, हे जनतेला आता उमगले आहे. युती गेली खड्ड्यांत, पहिले शेतकऱ्यांचे बोला असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे गरजत होते. समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्या म्हणत आहेत. समृद्धी महामार्गातून येणारे श्रीखंड कोण कोण खाणार आहे, हे आधी स्पष्ट झाले पाहिजे, असा सवालही चव्हाण यांनी यावेळी केला. 

दुष्काळाची दाहकता असताना शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेत नाहीत. अशा घोषणाबाज सरकारला तुम्हीच घराचा रस्ता दाखवा, असे आवाहन चव्हाण यांनी केले. 
व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री नसीम खान, माणिकराव ठाकरे, आमदार विजय वडेट्टीवार, आशीष देशमुख, के. आर. शेंडे, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा महिलाध्यक्ष उषा शहारे, माजीमंत्री बंडू सावरबांधे, माजी आमदार सेवक वाघाये यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

पुढील दोन महिन्यांत हे सरकार सर्वसामान्य लोकांना अनेक फंडे देतील, अनेक घोषणा करतील, अनेक निर्णय घेतील. पण या घोषणा, निर्णयांकडे लक्ष देऊ नका. चौकीदार चोर आहे असे म्हटले जाते. देशाचा चौकीदार चोर आहे. या चौकीदाराने सगळी गडबड केली आहे असेही श्री. चव्हाण म्हणाले. 

 सरकारला खाली खेचा : विखे पाटील 
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, पोटनिवडणुकीत गोंदिया-भंडारा जिल्ह्यात जसा इतिहास घडला. तसाच इतिहास केंद्र व राज्यात घडवायचा आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेस सत्तेत येताच धान्याला 2500 रुपये हमीभाव मिळाला. पण भाजप सरकार 1750 च्या वर पुढे सरकू शकली नाही असेही ते म्हणाले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com