दुष्काळाबाबत राज्यातल्या सरकारचा केवळ शब्दांचा खेळ - अशोक चव्हाण

दुष्काळाबाबत राज्यातल्या सरकारचा केवळ शब्दांचा खेळ - अशोक चव्हाण

नांदेड : संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्रात दुष्काळाने उग्र रूप धारण केलेले असतानाही हे सरकार शब्दांचा खेळ करत दुष्काळसदृष्य परिस्थिती असल्याचे जाहीर करते. यांना ना शेतकऱ्यांचा कळवळा, ना सर्वसामान्यांचा. गेली साडेचार वर्षे सहन केलेला मनःस्ताप अजून सहा महिने सहन करीत त्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठावे असे आवाहन खासदार अशोक चव्हाण यांनी केले. मराठवाड्यावर वक्रदृष्टी ठेवाल तर त्याची किंमत चुकवावी लागेल, असा सरकारला इशारा देत संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. 

कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे गुरुवारी मुखेडला व नंतर देगलूरला आगमन झाले. दोन्ही ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नांदेड जिल्हा बालेकिल्ला व होम टाऊन असल्यामुळे राज्याचे लक्ष होते. देगलूरला स्वागत झाल्यानंतर मोंढा मैदानात सायंकाळी झालेल्या सभेत खासदार चव्हाण बोलत होते. या वेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, बस्वराज पाटील, नसीमखान, आमदार वसंतराव चव्हाण, रावसाहेब अंतापूरकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
खोटी आश्‍वासने देऊन सत्तेवर आलेल्या या सरकारने कोणत्याच घटकासाठी चांगले काम केले नाही. राज्यावर नुसता कर्जाचा डोंगर उभारला गेलाय, याचे यांना काही देणे - घेणे नाही. निवडणुका जवळ आल्या की धार्मिक वाद, मंदिराचा वाद पुढे करत स्वतःची खिसे भरण्यात मंत्री मश्‍गूल असल्याचा आरोप त्यांनी केला. 

संसदेत नांदेडकर म्हणून अभिमान 
नांदेडने मराठवाड्याला, महाराष्ट्राला व देशात नेतृत्व केले. तुमच्या खंबीर पाठिंब्यावर ही सेवा करताना शंकरराव चव्हाण असोत, अथवा मी असो, कुठेही कमी पडलो नाही, पडणारही नाही. नांदेडचे नेतृत्व संसदेत करताना मला गर्व वाटतो, अन्‌ हे आपले ऋण मी तुमच्या पाठिंब्यावरच उपभोगत असल्याची जाणीव मला असल्याचे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मी आता निश्‍चिंत आहे, कारण संपूर्ण राज्यात मला फिरावे लागणार असल्याने नांदेडकर नांदेडची काळजी घेतील, असा आशावाद शेवटी खासदार चव्हाण यांनी व्यक्त केला. 

अपप्रवृत्तीचे सरकार गाडून टाका 
शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रति कोतेपणाची भूमिका घेणाऱ्या, सुशिक्षित बेकार व महिलाबाबत असंवेदनशिलपणाने वागणाऱ्या व महापुरूषांच्या बाबतीत अनुद्गार काढणाऱ्या मस्तवाल अपप्रवृत्तीच्या भाजप- शिवसेनेच्या सरकारला आगामी काळात गाडून टाकून समाजातील सर्व स्तरातील लोकांचे हित साधणाऱ्या कॉंग्रेस पक्षाच्या पाठिशी बळ उभे करा, असे भावनिक आवाहन तथा खासदार अशोक चव्हाण यांनी नायगाव येथे शुक्रवारी केले. 

व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, बसवराज पाटील, चारुलता टोकस, आमदार वसंत चव्हाण, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, रावसाहेब अंतापूरकर कविता कळसकर, अनिता इंगोले, वंदना पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आमदार वसंत चव्हाण यांनी केले. 

बाळासाहेब थोरात म्हणाले, की, शंकरराव चव्हाण हे राजकारणातील एक दीपस्तंभ होते. त्यांच्या रूपाने नांदेडने राज्याला व देशाला कुशल नेतृत्व दिलं होतं. सध्याचे सरकार खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल करत आहे. बॅंका बुडीत निघाल्या आहेत. भांडवलदार पैसे बुडवून परदेशात पळून गेले आहेत. देशाचा विकासदर थांबला आहे. शेतकरी, कारखानदार अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीत कॉग्रेसच्या सरकारशिवाय या देशाला पर्याय नाही '. 

हर्षवर्धन पाटील म्हणाले,' हे सरकार आंधळं व बहिरं आहे. लोकांचा आक्रोश यांना ऐकू येत नाही. यांच्या भावना बोथट झाल्या आहेत. महिला, बेरोजगार, शेतमजूर, शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी व हे संवेदनाहिन सरकार उलथून टाकण्यासाठी संघर्ष करणार आहे. त्यासाठी आपली साथ हवी आहे. 

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, " दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करता येईल, सुस्तावलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हा जनसंघर्ष आहे. सध्याच्या सरकार मध्ये द्रष्टे नेतृत्व नाही. रजाकारापेक्षाही जास्त अन्याय या सरकारचे चालू आहेत. प्रत्येक गोष्टीत यांना निकष लागतो. निकषाचा व्हायरस या सरकार मध्ये शिरला आहे. मोबाईल मध्ये व्हायरस शिरल्यावर जसे आपण फॉर्मेट मारतो. व आपला मोबाईल वाचवतो. तशी वेळ आता आली आहे. या सरकार ला ही फॉर्मेट मारून आपला देश वाचवा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, नरसी ते नायगाव दरम्यान मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com