ashok chavan and maratha kranti morcha | Sarkarnama

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढावा - अशोक चव्हाण

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

नांदेड : मराठा समाजाच्या भावनेचा बांध फुटला आहे. त्यामुळेच राज्यामध्ये आरक्षण प्रश्नावरुन रान उठले. विरोधी पक्षातील आमदारांचे राजीनामे मागण्यापेक्षा या सरकारचा शिवसेनेने जर पाठींबा काढला तर दबावाखाली येवून हे सरकार मराठा, धनगर व मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढेल. त्यासाठी शिवसेनेने या सरकारचा पाठींबा काढावा. असा सल्ला माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी आज येथे दिला. 

नांदेड : मराठा समाजाच्या भावनेचा बांध फुटला आहे. त्यामुळेच राज्यामध्ये आरक्षण प्रश्नावरुन रान उठले. विरोधी पक्षातील आमदारांचे राजीनामे मागण्यापेक्षा या सरकारचा शिवसेनेने जर पाठींबा काढला तर दबावाखाली येवून हे सरकार मराठा, धनगर व मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढेल. त्यासाठी शिवसेनेने या सरकारचा पाठींबा काढावा. असा सल्ला माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी आज येथे दिला. 

नांदेड येथील शासकीय विश्रामगृहावर सकल मराठा समाजाच्यावतीने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या बैठकीस आमदार डी. पी. सावंत, कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष डॉ.सुनील कदम, भाऊरावचे चेअरमन गणपतराव तिडके, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. रेखा पाटील आदींची उपस्थिती होती. 

खासदार चव्हाण म्हणाले की, कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली. परंतु त्यानंतर हे आरक्षण न्यायालयाने रद्द केले. दरम्यानच्या काळात सत्तांतर झाले. राज्यामध्ये भाजप सत्तेत आली. सरकारने मात्र न्यायालयात आपली भूमिका स्पष्टपणे मांडली नाही. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येऊ शकला नाही. मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने राज्यामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे काढले. नांदेड व मुंबईच्या मोर्चात मी स्वतः सहभागी झालो. मराठा समाजासह धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ही कॉंग्रेस पक्षाची पूर्वीपासून भूमिका राहिली आहे. 

जर विरोधी पक्षाच्या आमदारांनी किंवा खासदारांनी या प्रश्नावर राजीनामे दिले तर प्रश्न सोडविण्यासाठी याचा काही उपयोग होणार नाही. उलट विरोधी पक्षात राहून विधी मंडळामध्ये आवाज उठविण्याचे काम कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस करीत आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांचे राजीनामे मागण्यापेक्षा शिवसेनेच्या कुबड्यांवर सत्तेत असलेल्या या सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडण्यासाठी शिवसेनेने सत्तेच्या बाहेर पडावे. आपली खुर्ची धोक्‍यात आहे ही जाणीव होताच सत्ताधारी जागे होतील व आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. हे सांगतांनाच या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणीही श्री. चव्हाण यांनी यावेळी केली. 

मराठा समाजाचे आंदोलन पेटवून देवून मराठा व मराठेतर असा वाद लावून देवून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न सरकारमधील काही घटक करीत आहेत. याचा पुनर्उच्चार त्यांनी यावेळी केला. यासोबतच हिंसक आंदोलन न करता सनदशीर मार्गाने प्रश्न मार्गी लावावा यासाठी सर्वांचे प्रयत्न असावेत असे त्यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यात अनेक मराठा युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, यासाठी आपण जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना भेटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सर्वांना शांततेचे आवाहन केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख